विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे काँग्रेस सर्वाधिक जागांवर दावा करणार
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे काँग्रेस सर्वाधिक जागांवर दावा करणार आहे. केंद्रीय पातळीवरील नेत्यांसह राज्यभरातील जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधान परिषद निवडणुकीत पक्षादेशा विरोधात मतदान करणाऱ्या फुटीर आमदारांबाबतही या बैठकीत चर्चा झाली. त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय दिल्लीत गेल्यावर घेऊ, असे केंद्रीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे महासचिव के सी वेणूगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
काँग्रेसच्या आत्मविश्वासाने मित्रपक्ष अस्वस्थ?
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात भाजपच विजय रथ रोखण्यात यश मिळवले. त्यामध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. या यशामुळे काँग्रेस नेते कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून आपल्याला सर्वाधिक जागा मिळाव्या, अशी मागणी काँग्रेस कडून केली जाणार आहे. एकीकडे महायुतीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या तीनही प्रमुख पक्षांनी समसमान 96 जागा लढवाव्या, अशी चर्चा सुरू असताना काँग्रेसच्या सर्वाधिक जागांच्या दाव्यामुळे इतर घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
सरकारच्या लोकप्रिय योजनांचा घेतला धसका
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा धसका काँग्रेसने घेतला असल्याचे चित्र या बैठकीत बघायला मिळाले. मध्यप्रदेशमध्ये भाजपा सरकारने लाडली बहना योजना अमलात आणल्यानंतर त्या राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले. महायुती सरकारने महाराष्ट्रातही लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा प्रतिवाद करण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली.
कर्नाटक, तेलंगणातील सल्लागार करणार मार्गदर्शन
सरकारी योजनांचा प्रभावी प्रतिवाद करून या योजना फोल असल्याची भावना जनमानसात रुजविण्यासाठी कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात काँग्रेसच्या प्रचार आणि धोरण निश्चिती यासाठी सहकार्य करणारे सल्लागार महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत.
