पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा – खासदार संजय राऊत
मुंबई: देशाचे दुश्मन मोकाट असून दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल जवानांच्या हत्यांचे सत्र आरंभले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा मात्र धमक्या देणे, निवडणुका आणि इतर उद्योगात व्यस्त आहेत. गृहमंत्री म्हणून आलेल्या अपयशाची चाड असेल, जराशी तरी लाज वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी तिसऱ्यांदा शपथ घेत होते त्यावेळी देखील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांचे प्राण घेतले. या संहाराला केंद्र सरकार जबाबदार आहे. गृहमंत्री अमित शहा यांना मागील पाच वर्षात काहीही करता आले नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील कोणतीही कारवाई करत नाहीत. मोदी सरकार तिसऱ्या वेळा सत्तेत आल्यापासून तब्बल 40 जवानांचा बळी दहशतवाद्यांनी घेतला आहे.
… तर एवढे बळी जाताना पहावे लागले नसते
अमित शहा हे देशाच्या दुश्मनांपेक्षा आपल्या राजकीय विरोधकांना दुश्मन मानतात. राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी अमित शहा यांनी जेवढी ताकद वापरली तेवढी ताकद जर देशाच्या दुश्मनांविरुद्ध मणिपूर आणि जम्मू कश्मीर मध्ये वापरली असती तर भारतीय जवानांचे एवढे बळी जाताना पहावे लागले नसते, असेही राऊत म्हणाले.
