Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

मनसे शी संबंध नसलेल्या लोकांची यादी दाखवून शिवसेनेत पद मिळवण्याचा वसंत मोरेंचा प्रयत्न?

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून वंचित बहुजन आघाडी मार्गे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरे यांच्या जाण्याने मनसेला काहीही फरक पडणार नाही. त्यांच्याबरोबर पक्षाच्या एकही विद्यमान पदाधिकाऱ्याने शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. दोन दोन वर्ष पक्षाशी संबंध नसलेल्या लोकांची यादी दाखवून शिवसेनेत कुठले तरी पद पदरात पाडून घेण्याचा मोरे यांचा प्रयत्न आहे, असा आरोप मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर यांनी केला. 

वसंत मोरे यांनी मनसेकडून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे डाळ शिजेल का याची चाचपणी केली. तिथून नकारघंटा ऐकू येताच वंचितच्या झेंड्याखाली लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यानंतर त्यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी काम न केल्याचा आरोप करीत वंचितला सोडचिठ्ठी दिली. 

मोरे यांनी तब्बल शंभर गाड्यांचा ताफा घेऊन 9 जुलैला मातोश्री गाठली आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या नावाखाली ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती धारण केले. 

… तर अनामत रक्कम तरी वाचली असती 

यावेळी आपल्याबरोबर मनसेचे 2 शहरप्रमुख, शाखाप्रमुख, उप विभागप्रमुख, वेगवेगळ्या सेलचे प्रमुख अशा 23 मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा मोरे यांनी केला. मात्र, यापैकी काही जणांनी मोरे यांच्याबरोबर तर काहींनी त्याच्याही आधी पक्ष सोडला असून त्यांच्या जागेवर नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, असा बाबर यांचा दावा आहे. गाड्यांचा भलामोठा ताफा आणि जुन्या पुराण्या नावांच्या याद्या घेऊन गेल्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. नेते आणि कार्यकर्त्यांची एवढी मोठी ताकद मोरे यांच्या पाठीशी असती तर लोकसभा निवडणुकीत चित्र वेगळे दिसले असते. किमान मोरे यांची अनामत रक्कम तरी वाचली असती, अशा शब्दात बाबर यांनी मोरे यांची खिल्ली उडवली आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading