उलगडणार ‘पन्हाळा ते पावनखिंड’ शौर्यगाथेचा थरार
पुणे : वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या ३६४ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधत पुण्यातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ट्रस्ट यांच्या वतीने ‘गोष्ट इथे संपत नाही – पन्हाळा ते पावनखिंड’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या शनिवार दि. १३ जुलै रोजी ५७३ शनिवार पेठ येथील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कार्यालय ट्रस्ट या ठिकाणी सायं ५.३० वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
आयटी क्षेत्रात काम करणारे सारंग भोईरकर व सारंग मांडके हे दोन तरुण सदर कार्यक्रम सादर करणार असून मराठ्यांच्या इतिहासातील एखादी घटना निवडायची आणि त्याचे प्रभावी सादरीकरण करीत ती प्रेक्षकांसमोर सादर करायची असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. आपला गौरवशाली इतिहास गोष्टीरूपाने आणि रंजकपणे अधिकाधिक नागरिकांसमोर यावा, या उद्देशाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि १३ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमात वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय स्वामीनिष्ठेची गोष्ट ‘पन्हाळा ते पावनखिंड’ रसिकांना अनुभविता येणार आहे.
