‘ही’ व्यक्ती करणार अजितदादांचे ब्रॅण्डिंग
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने कंबर कसली आहे. त्या दृष्टीने पक्षाच्या वतीने नरेश आरोरा या व्यावसायिक रणनीतीकाराची नेमणूक करण्यात आली असून शासकीय योजनांचा प्रचार आणि अजित पवार यांच्या नावाचे नेता म्हणून ब्रॅण्डिंग ही अजित पवार गटाच्या निवडणूक रणनीतीची प्रमुख सूत्र असणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही फारसा प्रभाव दाखवता आला नाही. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या निवडणुकीत चमकदार कामगिरी केली. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक ही अजित पवार गटासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्याचे पक्षाने ठरविले आहे.
या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेची दिशा निश्चित करण्यासाठी अजित पवार गटाने नरेश अरोरा यांची नियुक्ती केली आहे. नरेश अरोरा हे design boxed. com या राजकीय प्रचार मोहीम व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. अरोरा यांनी या बैठकीत आमदारांसमोर आपल्या प्रचार मोहिमे संदर्भात दृकश्राव्य सादरीकरण केले.
अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक शासकीय योजनांची घोषणा केली आहे. त्यापैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि अशा अनेक योजनांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशा योजनांचा अधिकाधिक प्रचार प्रसार करणे, या योजनांची माहिती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविणे हे पक्षाच्या प्रचार मोहिमेतील प्राधान्याचे काम असणार आहे.
त्याचप्रमाणे समाजमनावर अजित पवार यांची प्रतिमा अधिक ठळकपणे ठसविण्याचे नियोजन ही पक्षाने केले आहे. प्रशासनावर पकड असणारा नेता, विकासाची कास धरणारा नेता, परखड बोलणारा स्पष्टवक्ता नेता, शब्दाचा पक्का, आश्वासनांची पूर्तता करणारा नेता, अशी अजित पवार यांची प्रतिमा मतदारांमध्ये ठसविण्याचे काम प्रचार मोहिमे दरम्यान केले जाणार आहे. सध्या अजित पवार गटाकडे 41 आमदार असून आगामी विधानसभा निवडणुकीत ही संख्या वाढविण्याचे पक्षाचे प्रयत्न असणार आहेत.
