Saturday, April 4, 2026
BLOGLatest NewsNATIONAL

तालिबानने पाकिस्तानला आव्हान

अफगाणिस्तानच्या घरात घुसून मारण्याच्या पोकळ धमक्या देऊ नका. आमच्यावर हल्ला करण्याची हिंमत तरी करून दाखवा आणि परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, अशा शब्दात अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबानने पाकिस्तानला आव्हान दिले आहे. 

तहरिक ए तालिबान पाकिस्तान आणि बलोच बंडखोरांना अफगाण तालिबान पोसत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. तालिबानने पोसलेल्या दहशतवाद्यांकडून पाक सैनिक, अर्धसैनिक दलाचे जवान आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात असताना देश आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अफगाणिस्तानच्या घरात घुसून हल्ले करू, अशी धमकी पाक संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी नुकतीच दिली आहे. अफगाणिस्तानच्या हद्दीत दहशतवाद्यांचे अड्डे असल्याचे पुरावे असल्याचा दावाही आसिफ यांनी केला आहे. 

या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने अफगाणिस्तानशी आगळीक करण्याचा कोणताही प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. पाकिस्तानी हल्ल्यांवर पलटवार करण्यासाठी त्यांच्यावर अतिशय घातक हल्ले चढविण्यात येतील. त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीशी तोंड देण्यास पाकिस्तानने तयारीत राहावे, असे तालिबानने पाकिस्तानला सुनावले आहे. 

 भारताचे शत्रू, अज्ञात बंदूकधारी आणि तालिबान

मागील काही काळापासून खुद्द पाकिस्तान आणि भारताच्या शत्रूंना आश्चर्य देणाऱ्या कॅनडासारख्या देशात भारतीय शत्रूंचा अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून खात्मा केला जात आहे. भारतातील दहशतवादी कृत्यांचे सूत्रधार असलेल्या तब्बल 34 जणांची आतापर्यंत हत्या करण्यात आली आहे. त्यामध्ये पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा खास अधिकारी असलेल्या एका ब्रिगेडियरचाही समावेश आहे. या सर्व हत्यांमागे भारताची आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघटना रिसर्च अँड ॲनालिसिस विंग अर्थात रॉचा हात असल्याचा आरोप केवळ पाकिस्तान आणि कॅनडाच नव्हे तर अमेरिका आणि ब्रिटननेही केला आहे. त्यातच अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएमधील निवृत्त महिला अधिकारी सारा ॲडम्स यांनी भारत तालिबांना हाताशी धरून या हत्या घडवून आणत आहे, असा दावा केला आहे. त्यासाठी भारताकडून तालिबानला पैसे दिले जातात, असा दावाही सारा ॲडम्स यांनी केला आहे. 

तालिबानवर भारताचे नियंत्रण? 

भारत सरकार रॉ च्या माध्यमातून तालिबानला पैसे देऊन त्यांच्याकडून भारताच्या शत्रूंचा बिमोड घडवून आणत आहे, एवढाच दावा करून ॲडम्स थांबलेल्या नाहीत तर तालिबानवर भारताचे नियंत्रण आहे. अमेरिकेसारख्या अनेक देशांनी आर्थिक नाकाबंदी केल्यामुळे विदेशी चलनाची चणचण असलेल्या तालिबानला अर्थपुरवठा करण्याबरोबरच तालिबानचा सर्वोच्च प्रमुख मुल्ला हिबातुल्ला आखुंजादा याच्या सुरक्षिततेची जबाबदारी रॉने स्वीकारली आहे, असाही त्यांचा दावा आहे 

वास्तविक, जगातील कोणत्याही काळातील कोणतीही महासत्ता अफगाणांना दीर्घकाळ नियंत्रणाखाली ठेवू शकली नाही, याला इतिहासाची साक्ष आहे. ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता अशा काळात ब्रिटिशांना अफगाणिस्तानवर राज्य करता आले नाही. शीतयुद्धाच्या काळात प्रयत्न करूनही रशिया अफगाणांना नियंत्रणात ठेवू शकला नाही. काही वर्षांपूर्वी भला मोठा फौजफाटा आणि साधनसामग्री अफगाणिस्तानच्या रणात उतरवूनही तालिबानला मुठीत ठेवणे त्यांना जमले नाही. या पार्श्वभूमीवर भारत तालिबानला नियंत्रित करीत असल्याचे म्हणणे धाडसाचे ठरेल. याशिवाय, तालिबानला आपल्या नियंत्रणात ठेवण्याची उठाठेव भारत का करेल, त्यापासून भारताला असा कोणता मोठा लाभ आहे, हा देखील एक प्रश्नच आहे. 

 खरे तर यापूर्वी पाश्चिमात्य, अमेरिकन प्रसारमाध्यमांनी भारत, रॉ आणि अज्ञात बंदूकधारी यांच्याबद्दल जे कथित (narrative) प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्याच प्रयत्नांना सारा ॲडम्स यांनी कोणताही ठोस पुरावा न देता केवळ तर्कबुद्धीच्या जोरावर तालिबानची फोडणी घातली आहे. पाकिस्तानातील बंडखोर आणि दहशतवादी यांना भारत रॉच्या माध्यमातून रसद पुरवत असल्याचा कंठशोष पाकिस्तानकडून नेहमीच केला जातो. तोच आरोप तालिबानवरही आहे. यावरून भारत आणि तालिबान यांच्यातील सोयरीक सिद्ध करण्यासाठीचे तर्कट अधिक पुढे नेले जाऊ शकते. भारतावर दबावाची टांगती तलवार कायम ठेवण्यासाठी अमेरिकेचे हे उद्योग आहेत आणि त्याला पाकिस्तानकडून कच्च्या मालाचा पुरवठा होत आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading