आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून खोटी व दिशाभूल करणारी कथिते करण्याचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस
मुंबई:: लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून खोटी व दिशाभूल करणारी कथिते (narrative) पसरविण्याचा प्रयत्न झाला तर बेसावध न राहता त्याचे ठामपणे खंडन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेत्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.
विधानसभा निवडणुका तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना सर्वच राजकीय पक्ष त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. सध्या महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने तर लोकसभा निवडणुकीत झालेली पीछेहाट भरून काढण्यासाठी कंबर कसली आहे.
त्यादृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती विभागाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत फडणवीस यांनी विरोधकांच्या अपप्रचाराचा आक्रमकपणे मुकाबला करण्याचे आदेश दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपला या समाज घटकाकडून मोठा फटका सहन करावा लागल्याचे सांगण्यात येते. भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 400 पेक्षा अधिक जागा मिळवल्यास ते घटना बदलणार, असा प्रचार विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. या प्रचारामुळेच दलित, मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती यांच्यासह इतर मागासवर्ग भाजपापासून दूर गेल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात 48 पैकी भाजपला केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत भाजपाने राज्यातील सर्वाधिक 23 जागांवर विजय मिळवला होता. यावर्षीच्या निकालाचे विश्लेषण करताना फडणवीस यांनी, आपला पराभव विरोधकांची लोकप्रियता वाढल्यामुळे नव्हे, तर विरोधकांनी पसरविलेल्या खोट्या कथितांबाबत गाफील राहिल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसारच आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या कथितांचे समर्थपणे खंडन करून समाजात पक्षाची प्रतिमा उंचावण्याचे आणि त्याचे रूपांतर मतात करण्याचे आवाहन फडणवीस यांनी नेत्या कार्यकर्त्यांना केले आहे.
