Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पहिला चित्रपट गद्दारी करण्यासाठी तर दुसरा गद्दारी पचविण्यासाठी काढला आहे – केदार दिघे

ठाणे :  शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना समजावून घ्यायचे असेल तर आयुष्य खर्ची घालावे लागेल. चित्रपटाच्या तीन तासात ते मावणारे नाही. हे चित्रपट काढणाऱ्यांनी पहिला चित्रपट गद्दारी करण्यासाठी तर दुसरा चित्रपट गद्दारी पचविण्यासाठी काढला आहे, अशा शब्दात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी धर्मवीर 2 च्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 

आनंद दिघे यांचा चरित्रपट असलेल्या धर्मवीरचा दुसरा भाग ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला फटका बसू नये, याच उद्देशाने हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचा आरोप दिघे यांनी केला आहे. 

 स्वतःची जाहिरात हा चित्रपटामागचा उद्देश 

आनंद दिघे यांच्या सानिध्यात असलेल्या सर्वांनाच त्यांचे व्यक्तिमत्व काय होते याची पूर्ण जाणीव आहे. त्यांना जाणून घ्यायचे असेल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन, गाव खेड्यातून अशा माणसांना भेटणे आवश्यक आहे. तीन तासाच्या चित्रपटातून आनंद दिघे यांचे व्यक्तिमत्व उलगडणे अशक्य आहे, असेही दिघे म्हणाले. हे चित्रपट काढणारे निव्वळ व्यावसायिक आहेत. आनंद दिघे यांचे व्यक्तिमत्व दर्शकांसमोर आणण्यापेक्षा स्वतःची जाहिरात करणे हाच त्यामागचा उद्देश आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

…. तर महाराष्ट्रातील जनतेचा उत्कर्ष कधी करणार?

‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट,’ अशी धर्मवीर 2 या चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्याचा उल्लेख करून, तुम्ही प्रत्येक वेळी जाती-धर्मात अडकून पडणार असाल तर महाराष्ट्रातील जनतेचा उत्कर्ष कधी करणार, असा सवाल केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला आहे. आनंद दिघे यांचे हिंदुत्व अत्यंत व्यापक स्वरूपाचे होते. ते जाती धर्मावर आधारलेले नव्हते, असेही ते म्हणाले.

 लोकांच्या भावनांशी खेळ…

 धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागात अनेक खोट्या गोष्टी दाखविण्यात आले आहेत. याचा अर्थ धर्मवीर आनंद दिघे यांच्याबद्दल जनमानसात असलेल्या भावनांशी ते खेळले आहेत. त्यावेळी, खरा चित्रपट अजून बाकी आहे, असे शिंदे यांनी नमूद केले होते. याचाच अर्थ चित्रपटाच्या पहिल्या भागात तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळला आहात. वास्तविक हे कधीच खरे धर्मवीर दाखविणार नाहीत. खरे धर्मवीर तीन तासाच्या चित्रपटात मावणार नाहीत, असेही केदार दिघे म्हणाले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading