Tuesday, November 10, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राजेश विटेकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

परभणी : लोकसभा निवडणूकीच्या रिंगणातून अंतीमक्षणी माघार घेतलेल्या राजेश विटेकर यांना विधान परिषद निवडणूकीत उमेदवारी बहाल केली जाईल अशी स्पष्ट चिन्हे असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विटेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंबंधी सोमवारी सायंकाळी निर्देश दिले आहेत. दरम्यान, विटेकर यांनी आपण मंगळवारी (दि.02) मुंबईत विधान परिषदेकरीता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत अशी माहिती दिली. 

2019च्या लोकसभा निवडणूकीत विटेकर यांचा  चाळीस-बेचाळीस हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. विटेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास त्याचे चांगलेच शल्य बोचले. त्यामुळेच 2024 च्या निवडणूकीतून त्या पराभवाची परतफेड करु, असा विश्‍वास बाळगून विटेकर यांच्यासह राष्ट्रवादीने नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली. दुर्देवाने राज्य पातळीवरील समीकरणे विशेषतः बारामतीतील मोर्चेबांधणी डोळ्यासमोर ठेवून महायुतीने विटेकर यांना थांबण्याचा सल्ला देवून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना अंतीम क्षणी परभणीत रवाना केले. 

महायुतीच्या श्रेष्ठींचा तो निर्णय स्थानिक पातळीवरील नेतेमंडळींसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांना चक्रावून सोडणाराच ठरला. परंतु, मनावर बिंबलेल्या ‘अब की बार चारसों पार’च्या नार्‍या पोटी मोदी भक्तांनी तो निर्णयसुध्दा पचवला अन् डोळे झाकून शिट्टी फुंकली. तरीसुध्दा जानकर यांचा मोठा पराभव झाला. त्या पराभवाचे आता कारणमिमांसा सुरु झाली खरी, परंतु त्यातून जानकर ऐवजी विटेकर यांना रिंगणात उतरवले असते तर जागा निघाली असती असाही एक निष्कर्ष समोर आल्यानंतर महायुतीच्या स्थानिक नेतेमंडळीबरोबर श्रेष्ठींनीसुध्दा आळीमिळी गुपचिळीचे धोरण स्विकारले. त्यामुळे विटेकर यांच्यासह समर्थक ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ अशी स्थिती अनुभवू लागले. त्यास लोकसभा निवडणूकीच्या रिंगणातून ऐनवेळी माघार घेतल्यानंतर खुद्द श्रेष्ठींनी म्हणजेच अजित दादा यांनी परभणीच्या जाहीर सभेतून राजेशला विधीमंडळावर घेवू असा दिलेला शब्द कारणीभूत ठरला. त्या शब्दापोटीच विटेकर व त्यांचे समर्थक मोठ्या आशेने अन् अपेक्षेने मुंबई-दिल्लीतील प्रत्येक राजकीय घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवून बसले होते.  सोमवारी सकाळपासून मुंबईत या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या. त्यानंतर विटेकर यांचे नाव पुढे आले. 

Leave a Reply