विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार ‘धर्मवीर 2’
मुंबई: प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु असलेले शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या चरित्र पटाचा दुसरा भाग विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या धर्मवीर 2 च्या पोस्टरचे अनावरण नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
धर्मवीर चित्रपटाचा पहिला भाग सन 2022 मध्ये प्रदर्शित करण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही काळातच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. त्यांच्या समर्थक आमदारांची संख्या 14 वरून 40 पर्यंत गेली आणि महाविकास आघाडीला पायउतार करून भारतीय जनता पक्षाबरोबर जात शिंदे गटाने राज्यातील सत्ता हस्तगत केली.
त्यावेळी हा चित्रपट राजकीय उद्देशाने प्रेरित असल्याची टीका करण्यात आली होती. शिवसैनिक आणि शिवसेनेचे सहानुभूतीदार मतदार यांच्या मना शिंदे यांच्या बंडाला अनुकूल पार्श्वभूमी तयार करण्याच्या दृष्टीने हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आल्याच्या चर्चाही झडल्या.
राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता असताना धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग दि 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे त्यामुळे निवडणूक प्रचार मोहिमेचा मुहूर्त साधून धर्मवीर 2 च्या प्रदर्शनाची वेळ निवडली गेली असल्याच्या चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अपेक्षित कामगिरी पार पाडता आलेली नाही. भारतीय जनता पक्षाची कामगिरी तर अत्यंत सुमार दर्जाची झाली आहे. भाजपचा महाराष्ट्रातील चेहरा असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खलनायक ठरविण्याचा विरोधकांचा डाव अत्यंत प्रभावी ठरला आहे. त्यातच महायुतीचे नेते सर्वकाही अलबेल असल्याचे दाखवत असले तरीही भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवरील नेते यांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या कार्यकर्त्यांचे खटके वारंवार उडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य राखायचे असेल तर शिंदे गटाला महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्यासाठी धर्मवीर 2 चे प्रदर्शन हातभार लावणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
