T20 World Cup 2024: भारताने विश्वचषक जिंकला
बार्बाडोस : सूर्यकुमार यादवने अखेरच्या षटकात पकडलेल्या डेव्हिड मिलरच्या झेलच्या जोरावर भारताने टी वर्ल्ड कप जिंकला. मिलर हा भारताच्या विजयातील मोठा अडसर होता. पण हार्दिकच्या गोलंदाजीवर तो बाद झाला आणि भारताच्या बाजूने सामना झुकला. भारताने यावेळी १३ वर्षांच्या दुष्काळ संपवला.
भारताने यापूर्वी वर्ल्ड कप २०११ साली जिंकला होता. विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १७६ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताने गोलंदाजीची दमदार सुरुवात करत दक्षिण आफ्रिकेची २ बाद १२ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण अखेरच्या षटकात जेव्हा मिलर बाद झाला त्यानंतर भारताने ७ धावांनी हा सामना जिंकला.
विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा करता आल्या. कोहलीने यावेळी ५९ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७६ धावांची खेळी साकारली. भारताच्या या धावसंख्येमध्ये मोलाचा वाटा होता तो अक्षर पटेलचा. अक्षरने १ चौकार आणि चार षटाकारांच्या जोरावर ३१ चेंडूंत ४७ धावांची खेळी साकारली.
