Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

दिव्यांगांना मदत अशी करा की जगण्याची उमेद मिळेल : रीना पाटील


पुणे : सहृदयी समाजाच्या सहकार्यामुळे आमचे जगणे सुकर झाले आहे. आमच्या सारख्या दिव्यांग व्यक्तींना समाजाने मदत करावी; पण आमच्याविषयी अनाठायी सहानुभूती बाळगू नये. मदत अशी करा जी आम्हाला जगण्यासाठी उमेद देईल, अशा भावना रीना पाटील यांनी व्यक्त केल्या.

ज्येष्ठ दृष्टीहीन, मूकबधीर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त आडकर फौंडेशनतर्फे डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्काराने अंधत्वावर मात करून स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या कर्तृत्ववान महिला रीना पाटील यांचा आज (दि. 27) गौरव करण्यात आला. त्या वेळी त्या सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या. पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कराचे वितरण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आप्थॅलमॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाईंडचे राष्ट्रीय सल्लागार दिलीप शेलवंते यांची प्रमुख उपस्थिती होती. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर व्यासपीठावर होते.
प्रास्ताविकात ॲड. आडकर म्हणाले, पुरस्कारप्राप्त व्यक्तीचे कार्यकर्तृत्व समजल्यानंतर समाजामध्ये सकारात्मकता निर्माण होऊन जिद्द वाढावी या करिता या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाते.
रीना पाटील पुढे म्हणाल्या, आमच्यात शारीरिक कमतरता असली तरी समाजाने आम्हाला ऐकावे, स्पर्शाने समजून घ्यावे, गंधाने जाणावे अशा तऱ्हेने पंचेद्रियांचा वापर करीत आमच्याशी मैत्री करावी, आपला मैलिक वेळ द्यावा, ज्यायोगे आमची जगण्याची जिद्द वाढेल आणि समाजात ताठपणे उभे राहण्यास मदत मिळेल. जन्मत:च अंध असल्याने कुटुंबासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला होता परंतु मी जिद्दीने शिक्षकांच्या सहकार्याने उच्च शिक्षण पूर्ण केले. समाजासाठी काहीतरी करावे, उद्योजिका व्हावे असा मानस होता. ज्येष्ठ असल्याने कौटुंबिक जबाबदारीच्या भावनेतून आर्थिक स्थैर्य मिळावे या हेतूने बँकेत नोकरी करण्यास सुरुवात केली. यातून आर्थिक पाठबळ मिळाल्याने समाजाचे देणे लागते या जाणिवेतून समाजकार्यही सुरू केले. पुरस्काराच्या निमित्ताने गतजीवनातील प्रसंगांना उजाळा मिळतो, प्रत्येक मदतनीस, मार्गदर्शकाच्या आठवणी जागृत होतात असे सांगून रीना पाटील म्हणाल्या, डॉ. हेलन केलर यांच्यानावे आडकर फौंडेशनतर्फे डॉ. केळकर यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे.

संकटे माणसाला जिद्दी बनवितात : डॉ. श्रीकांत केळकर
डॉ. आडकर फौंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्काराने अंध व्यक्तींचे महान कर्तृत्व समाजापर्यंत पोहोचून सामान्य नागरिकांनाही जगण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन मिळते. जीवनात येणारी संकटे माणसाला जास्त जिद्दी बनवितात त्यामुळे कोणत्याही नकारात्मक परिस्थितीत घाबरून न जाता आहे त्या परिस्थितीला भिडणे आणि यश संपादन करणे आवश्यक आहे, असे मत डॉ. श्रीकांत केळकर यांनी व्यक्त केले.

दिलीप शेलवंते म्हणाले, आमच्यातील कार्यकर्त्यांना या पुरस्काराच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले याकरिता आडकर फौंडेशनचे आम्ही ऋणी आहोत. दृष्टीहिन व्यक्ती अत्यंत जिद्दी आणि स्वाभिमानी असतात. त्यांना योग्य ती संधी उपलब्ध करून देणे हे समाजाचे कर्तव्य आहे.

मान्यवरांचे स्वागत ॲड. प्रमोद आडकर यांनी केले. सूत्रसंचालन, सन्मानपत्र वाचन निरुपमा महाजन यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित ‌‘अंधारातून प्रकाशाकडे‌’ या विषयावरील कविसंमेलनात श्रीनिवास शारंगपाणी, वासंती वैद्य, राजश्री लेले, स्वप्नील पोरे, सौदामिनी साने, शिवप्रिया सुर्वे, तनुजा चव्हाण, नीलाक्षी महाडिक, प्रतिमा कुलकर्णी, मिलिंद शेंडे, मीरा शिंदे, डॉ. ज्योती रहाळकर, प्रज्ञा महाजन यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन वैजयंती आपटे यांनी केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading