Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

एआयच्या मदतीने अभिनेता सुबोध भावे झाला तरूण

छोट्या पडद्यावर पुनरागमन

सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे. मात्र मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे.  ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे.

या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्याच्या जोडीला अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या दोन्ही व्यक्तीरेखांच्या वयामध्ये जवळपास २०-२५ वर्षांचे अंतर असणार आहे. यात अभिमन्यू या कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत सुबोध आणि तरुण माहीच्या भूमिकेतही तोच दिसणार आहे. तन्वी या भूमिकेत शिवानी गौरी दिसणार आहे. ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या निमित्ताने दोन वेगळ्या काळांतल्या भूमिका आणि नव्वदीच्या काळातील आठवणी पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहेत.एआयचा वापर करून ह्या मालिकेतल्या व्यक्तिरेखा साकारल्या जाणार आहेत.

या नव्या प्रयोगाचा एक भाग म्हणून आणि मालिकेच्या जाहिरातीकरता एक भन्नाट कल्पनाही लढवली होती. ६ मे १९९१ रोजी सुबोधने त्याची पत्नी मंजिरी हिला प्रपोज केले होते. अभिनेत्याच्या आयुष्यातल्या या गोड क्षणानिमित्त त्याने ६ मे २०२४ रोजी एक व्हिडिओ शेअर केला. त्याने त्या क्षणी नेमकं काय घडलं होतं, हे अत्यंत आगळ्यावेगळ्या शैलीत सांगितलं. या व्हिडिओमध्ये ३३ वर्षांपूर्वीचा सुबोध दिसला, मात्र त्यासाठी कोणताही जुना फोटो किंवा व्हिडिओ वापरला नव्हता, तर एआयचा वापर करून सुबोधने ही किमया साधली. तर मालिका सुरू होण्यापूर्वी शिवानीने सुबोध भावे याला त्याच्या मालिका-चित्रपटांची आठवण करून देणारी एक खास फ्रेम भेट म्हणून दिली.

“नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची! कारण, जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते!” ‘तू भेटशी नव्याने’ या शीर्षकाप्रमाणेच नव्या रूपात नव्या वळणार होणारी ही भेट नेमकी कशी असेल? या प्रेमकथेचे रंग कसे बहरणार?  येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९. वा. पाहायला विसरू नका ‘तू भेटशी नव्याने’ही मालिका.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading