Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

कादंबरी प्रकाशित करण्यासाठी लेखिका परतली आपल्या मातृभूमीत

पुणे : मूळच्या पुण्याच्या असलेल्या मात्र, सिंगपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या सुनीता लाड-भामरे आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मायदेशी परतल्या असून त्यांच्या ‘काली अँड द मिस्टरियस ट्विन्स: कीपर्स ऑफ द बिग सिक्रेट’ या कादंबरीचे प्रकाशन नुकतेच औंध येथील क्रॉसवर्ड या ठिकाणी संपन्न झाले.

मध्यमवयीन लहान मुलांसाठी ही एक रहस्यमय कादंबरी असून सिंबायोसिस स्कूल्सच्या सेंट्रल डायरेक्टोरेटच्या मुख्याध्यापिका डॉ. गार्गी मित्रा, डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या प्राचार्या पल्लवी नाईक, एसईएस गुरुकुल विद्यालयाच्या संस्थापक मुख्याध्यापिका शुभा भावे आणि सॅपलिंग स्कूलच्या संस्थापिका कमला इदगुंजी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुस्तकाविषयी बोलताना सुनीता लाड- भामरे म्हणाल्या, “मध्यमवयीन मुलांसाठी त्यांना गुंतवून ठेवणारी आणि त्यांना विचार करायला लावेल अशा विषयावरील कादंबरीची गरज ओळखून मी ही कादंबरी लिहिण्याचा निर्णय घेतला. मुलांना कल्पनाविश्वात रमविणारी अशी ही कादंबरी असून वास्तविक जगातील समस्यांची जाणीव करून निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करण्याची प्रेरणा देखील ती वाचकांना देते. कॉंक्रिटच्या जंगलात झपाट्याने कमी होत जाणाऱ्या निसर्गाच्या अनेक पैलूंची माहिती ही कादंबरी वाचकांना करून देते.”

ही कादंबरी एकूण १६९ पानांची असून कादंबरीची नायिका काली ही एका माळ्याच्या मुलगी असते. तिची मैत्री काही जादुई झाडांशी होते आणि त्यातून तिच्यासमोर अनेक रोमांचकारी व साहसी प्रसंग उभे ठाकतात, काली याचा सामना कशी करते याची विस्मयकारी सफर ही कादंबरी आपल्याला घडवते असेही लेखिका म्हणाल्या.

या गूढ कादंबरीने याआधीच ऑनलाईन विक्रीत लक्षणीय यश मिळवले आहेच शिवाय अॅमेझॉनच्या सायन्स फिक्शन आणि फॅन्टसी या विभागा अंतर्गत बेस्ट सेलर बॅज देखील मिळवला आहे हे विशेष.

सुनीता लाड-भामरे यांनी या आधी ‘ग्रँडमा लिम्स पर्सिमन्स’, ‘गंगा जमुना’ आणि ‘ट्रायम्फ ऑन द टर्फ’ यांसारख्या पुस्तकांचे लेखन केले आहे. यासोबतच ‘निर्झरी’ आणि ‘ब्लू डायमंड’ या दोन नाटकांच्या त्या लेखिकाही आहेत. अनेक लघुपटांचे पटकथा लेखन आणि निर्मिती त्यांनी केली आहे. सू’ज शॉर्ट स्टोरीज या यु ट्यूब चॅनेलवर सुनीता लाड- भामरे या आपल्या कथाही सांगत असतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading