आमची बाजू मांडण्याची पुरेशा प्रमाणात संधी मिळाली पाहिजे, राहुल गांधी यांनी व्यक्त केली अपेक्षा
नवी दिल्ली: सरकारला सहकार्य करण्याचीच विरोधकांची भूमिका राहील. मात्र, संख्याबळाच्या आधारे आमचा आवाज दडपता येणार नाही. सभागृहात आम्हाला बोलू दिले पाहिजे. आमची बाजू मांडण्याची पुरेशा प्रमाणात संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची पुन्हा निवड करण्यात आली. लोकसभा अध्यक्ष पदासाठी सन 1976 नंतर प्रथमच निवडणूक पार पडली. यावेळी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने ओम बिर्ला तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेसचे खासदार के सुरेश रिंगणात होते. आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी बिर्ला यांचा अभिनंदन करून त्यांना अध्यक्ष स्थानावर बसविले. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आगपाखड करणाऱ्या मोदी आणि गांधी या दोन्ही नेत्यांनी यावेळी हस्तांदोलन केले. संपूर्ण सभागृहाने त्याचे स्वागत केले. त्यानंतर सभागृहात बोलताना राहुल गांधी यांनी यापुढे विरोधक सभागृहात जोरकस भूमिका घेतील हे सूचित केले.
या अठराव्या लोकसभेत विरोधी पक्ष मजबूत आहे. सरकारकडे बहुमत आणि संख्याबळ असले तरीही इंडिया आघाडी हा सर्वसामान्य भारतीय जनतेचा आवाज आहे. हा आवाज सरकारला दडपून टाकता येणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला. नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्ष विरोधकांना सभागृहात आपली बाजू मांडण्याची संधी देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आम्हाला सभागृहात बोलू दिले पाहिजे. विरोधकांचा आवाज झडपणे हे लोकशाही विरोधी आहे. विरोधकांना गप्प बसवून संसद चालविता येणार नाही. सरकारला सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. मात्र, सभागृहात विरोधकांना त्यांचे मत मांडण्याची संधी मिळणे आवश्यक आहे, असेही गांधी म्हणाले.
या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामगिरीचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी यापुढील काळात संख्याबळाच्या आधारे विरोधकांचा आवाज दडपता येणार नाही, याची जाणीव गांधी यांनी सरकारला करून दिली. विविध मुद्द्यांवर विरोधक आक्रमक भूमिका घेतील,, असेही त्यांनी सूचित केले.
