अ. भा. मराठी प्रकाशक संघाकडून जगन जंगले यांना आर्थिक मदत
पुणे : लोकल प्रवासात चोरट्यांशी झालेल्या झटापटीनंतर लोकलखाडी सापडून अपंगत्व आलेल्या युवकास अ. भा. मराठी प्रकाशक संघातर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे, अशी माहिती प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, सुकुमार बेरी, पराग लोणकर व किरण आचार्य यांनी निवेदनाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे. धनादेशासह प्रकाशक संघातर्फे त्यांना भविष्यात जयपूर फूट बसवण्यासंदर्भात पत्राद्वारे मदतीचे आश्वासनही देण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, गरीब शेतकरी कुटुंबातील युवक जगन जंगले (वय 31) हे दादर येथील मॅजेस्टिक बुक सेंटर येथे नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. याच वर्षी त्यांनी संसार थाटला आहे. जंगले यांच्यावर लोकल प्रवासात मोबाइल चोरांकडून आघात झाला. मोबाईल चोरांशी झालेल्या झटापटीत जगन जंगले लोकलखाली पडल्याने त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले. अपंगत्व आल्याने त्यावरील उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे तसेच पुढील उपचारांसाठी अजूनही खर्च अपेक्षित आहे. आताच्या शारीरिक व मानसिक परिस्थितीला तोंड देणाऱ्या जंगले यांना एवढा मोठा खर्च करणे अशक्य आहे.
जंगले यांच्यावर आलेल्या अवघड प्रसंगात अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने जंगले यांच्यासाठी मदत-निधी उभा करण्याचे ठरवले व आपल्या सर्व सभासदांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत संघाच्या 84 सदस्यांनी केलेल्या मदतीतून जमा झालेली 1 लाख 51 हजार 136 रुपये जंगले यांना कल्याण येथील त्यांच्या घरी प्रकाशक संघांचे अध्यक्ष राजीव बर्वे, खजिनदार सुकुमार बेरी, प्रमुख कार्यवाह पराग लोणकर व कार्यकारिणी सदस्य किरण आचार्य यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. रकमेच्या धनादेशाबरोबरच प्रकाशक संघातर्फे जंगले यांना आगामी काळात जयपूर फूट बसवण्यासाठी मदतीचे आश्वासनही देण्यात आले आहे. ज्यायोगे जंगले यांना नव्या उमेदीने कामास सुरुवात करणे शक्य होईल.
समाजातील दानशूर संस्था व नागरिक जंगले यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदत देऊ इच्छित असतील त्यांनी कृपया प्रकाशक संघाचे प्रमुख कार्यवाह पराग लोणकर (9850962807) यांना संपर्क साधावा, असे आवाहन प्रकाशक संघातर्फे करण्यात येत आहे.
जगन याच्याशी झालेल्या संवादातून त्यांनी या अतिशय कठीण परिस्थितीत दाखवलेले धैर्य आणि पुस्तक विश्वाविषयी त्यांना असलेली आपुलकी याचे दर्शन घडले, असे प्रकाशक संघांने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
