सरकारने दोन समाजांमध्ये भेदभाव न करता सम प्रमाणात न्याय मिळवून देण्याची काळजी घ्यावी – वडेट्टीवार
जालना: संख्येने मोठा असूनही इतर मागासवर्गीय समाज एकत्र येत नाही, आक्रमक होत नाही याचा अर्थ कोणीही येऊन आमच्या छाताडावर नाचावे, असा होत नाही, अशा कडक शब्दात काँग्रेस आणि इतर मागासवर्गीय समाजाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. सरकारने दोन समाजांमध्ये भेदभाव न करता सम प्रमाणात न्याय मिळवून देण्याची काळजी घ्यावी, याची जाणीवही त्यांनी करून दिली.
आरक्षण बचाव या मागणीसाठी उपोषण करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची वडेट्टीवार यांनी उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. तिथूनच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला. उपोषण सुरू होऊन एक आठवडा झाला तरी सरकारचे शिष्टमंडळ न आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन मंत्र्यांची शिष्टमंडळ उद्याच उपोषणकर्त्यांची भेट घेईल, अशी ग्वाही दिली.
ओबीसी समाज संख्येने मोठा आहे. त्यामध्ये शेकडो जातींचा समावेश आहे. मात्र हा समाज मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आक्रमक होत नाही. याचा अर्थ आम्ही इतरांची दादागिरी आणि अन्याय सहन करू, असा समज कोणी करून घेऊ नये, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.
आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करणे, हा सर्वांना संविधानाने दिलेला अधिकार आहे. मात्र, सरकारच्या दृष्टीने सर्व समाज सारखेच असले पाहिजे. सरकारने त्यात भेदभाव करता कामा नये. एका समाजाच्या आंदोलकांसमोर लाल गाडीचे पसरायचे आणि दुसऱ्या घटकांना वाऱ्यावर सोडायचे, असे केले जाऊ नये, असेही वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सध्या जातीपातींमध्ये मोठ्या प्रमाणात विपुष्ट निर्माण झाल्याचे चित्र आहे. समोरासमोर आले तर एकमेकांची तोंडेही बघितली जात नाहीत असे चित्र आहे. हे चित्र महाराष्ट्राला भूषण आवाहन आहे. मात्र, काही राजकारणी आपल्या मतांच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी या वातावरणाच्या आगीत तेल ओतत आहेत, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी राजकारण्यांनाही घरचा आहेर दिला.
