Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भुजबळांच्या आत्ताच्या भूमिका शिवसेनेशी सुसंगत ठरणाऱ्या नाहीत – संजय राऊत

मुंबई:   राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ एकेकाळी शिवसेनेत असले तरीही त्यांच्या राजकीय प्रवासातील शिवसेनेचे वळण बरेच मागे पडले आहे. त्यांच्या आत्ताच्या भूमिका शिवसेनेशी सुसंगत ठरणाऱ्या नाहीत. त्यांच्या शिवसेना प्रवेशाबाबतच्या चर्चा केवळ संभ्रम पसरविण्यासाठी केल्या जात आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. 

 भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा असतानाही त्यांची उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्याने रिकाम्या झालेल्या राज्यसभेतील जागेवरही भुजबळ यांच्या ऐवजी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांची वर्णी लावण्यात आली. त्यामुळे भुजबळ नाराज असून ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या दृष्टीने त्यांच्या चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र राऊत यांनी याचा इन्कार केला आहे.

 एकेकाळी शिवसेनेत असलेले भुजबळ आधी काँग्रेसमध्ये आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आता ते अजित पवार गटात आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासंबंधी त्यांच्याशी कोणताही राजकीय संवाद झालेला नाही आणि इथून पुढे तो होण्याची शक्यताही नाही. भुजबळ यांनी आपला मार्ग निवडला आहे आणि तो शिवसेनेच्या ध्येय धोरणांशी सुसंगत असणार नाही. त्यांच्या शिवसेना प्रवेशासंबंधीच्या  बातम्या या केवळ अफवा आहेत. संभ्रम निर्माण करण्याच्या दृष्टीने त्या पसरविल्या जात आहेत, असे राऊत म्हणाले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading