Tuesday, November 10, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जॉब फेअर २०२४’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

राज्यभरातून १५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाणिज्य विभाग आणि आयसीए एज्यु स्किल्स यांच्या संयुक्त विद्यामाने ‘जॉब फेअर २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात झालेल्या या रोजगार मेळाव्यात राज्यभरातून १५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्धाटन करण्यात आले. याप्रसंगी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाते डॉ. वाय. एम. मिठारे, वाणिज्य विभागाच्या विभागप्रमुख डॉ. शामला गीरीकीपती, आयसीए एज्यु स्किल्सचे नॅशनल प्लेसमेंट हेड अरिंदम चॅटर्जी आणि उत्तर – पश्चिम विभागाचे एवीएम एजाज भोरी आदी उपस्थित होते.

विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात झालेला हा मेळावा वाणिज्य क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील १८ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ज्यात जेनपेट, टीसीएस, ॲक्सिस बँक, सीएसबी बँक अशा नामांकीत कंपन्याचाही समावेश होता. या रोजगार मेळाव्यासाठी २५०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील सुमारे १५०० विद्यार्थी मुलाखतीसाठी हजर होते. यापैकी २५० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १ लाख ८० हजार ते ५ लाख रुपये प्रति वर्षपर्यंत पॅकेज मिळाले आहेत. याप्रसंगी आयसीएचे प्रतिनिधी आणि विद्यापीठाच्या विविध अधिकारी वर्गाने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

Leave a Reply