म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय? हे वाचा
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी व्यापक आर्थिक ज्ञान आवश्यक
बेंगळुरू : म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आणि गैर-गुंतवणूकदार (मिलेनिअल आणि जनरेशऩ झेड) यांच्यावर नवी म्युच्युअल फंडाने अलीकडे केलेल्या संशोधनात्मक अभ्यासातून व्यक्तींच्या निर्णयक्षमता आणि संभाव्य ज्ञानातील अंतर याच्याबद्दल काही खास अशा बाबी उघड झाल्या आहेत. हा अभ्यास अधिकाधिक आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करतो. तसेच तरुण प्रौढांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम बनविण्याबाबत असलेले गैरसमज दूर करतो.

अभ्यासामुळे प्रकाशझोतात आलेले काही प्रमुख निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.
सर्वाधिक प्राधान्य = परतावा
फंड निवडताना प्रत्येक दोघांपैकी एका गुंतवणूकदारांसाठी परतावा हे सर्वोच्च प्राधान्य असते. हे अॅक्टीव्ह आणि इंडेक्स फंड या दोन्हीसाठी लागू झालेले दिसते.
इंडेक्स फंडाबाबत अल्प माहिती
प्रत्येक तिघांपैकी एक इंडेक्स फंड गुंतवणूकदारांना इंडेक्स फंडाची संकल्पना पूर्णपणे समजत नाही. अल्प शुल्क आणि मित्र तसेच कुटुंबाकडून मिळालेले सकारात्मक अनुभव यामुळे इंडेक्स फंडांना प्राधान्य दिले जाते, हे या अभ्यासातून दिसून आले आहे.
सोशल नेटवर्क्स आणि “फिन-फ्लुएंसर्स” वर जास्त अवलंबून राहतात
तब्बल 80 टक्के गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या माहितीसाठी त्यांच्या सोशल नेटवर्क्स आणि “फिन-फ्लुएंसर” वर अवलंबून असतात आणि गुंतवणूकीसाठी ही धक्कादायक बाब ठरु शकते.
अभ्यासातील काही प्रमुख गैरसमज खाली ठळकपणे नमूद केलेले आहेत.
- गैरसमज1: म्युच्यूअल फंड गुंतवणूकीसाठी विस्तृत आर्थिक ज्ञान आवश्यक असते.
तब्बल 60 % पेक्षा जास्त उत्तरदात्यांचा असा विश्वास आहे की, म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी व्यापक आर्थिक ज्ञान आवश्यक आहे आणि हिच बाब संभाव्य गुंतवणूकदारांना गुंतवणूकीपासून परावृत्त करते.
- गैरसमज2: गुंतवणूक सुरू करण्यासाठी एकरकमी मोठा निधी आवश्यक असतो.
अनेक म्युच्युअल फंड मर्यादित प्रारंभिक भांडवलासह गुंतवणुकीला परवानगी देत असले तरीही, गुंतवणूक सुरू करण्यासाठी मोठ्या एकरकमी निधीची आवश्यकता आहे, ही धारणा प्रत्येक तिघा संभाव्य गुंतवणूकदारांपैकी एका गुंतवणूकदाराला गुंतवणूकीपासून परावृत्त करते.
- गैरसमज3: गुंतवणूक अॅप जर बंद पडले तर आपली गुंतवणूक सुरक्षित नसते
जवळपास 50 टक्के गैर-वापरकर्त्यांना भीती वाटते की गुंतवणूक ॲप बंद झाल्यास त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहत नाही.
नवीच्या अभ्यासातून पुढे आलेले निष्कर्ष गुंतवणुकदारांना सक्षम करण्यासाठी अधिक आर्थिक साक्षरतेच्या उपक्रमांची गरज अधोरेखित करतात. म्युच्युअल फंड हाऊसेस वापरकर्त्यासाठी म्युच्युअल फंड संकल्पना आणि गुंतवणूक प्रक्रिया सुलभ करु शकणारे अनुकूल शैक्षणिक संसाधने आणि साहित्य विकसित करू शकतात आणि प्रदान करू शकतात. त्यामुळे सामान्य गैरसमज दूर होऊ शकतात. अशा विश्वासार्ह आणि खात्रीच्या संसाधनांचा वापर सुलभ केल्याने तरुण गुंतवणूकदारांसमोरील अडथळे लक्षणीयरीत्या कमी होतात आणि त्यामुळे त्यांना अधिक माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेता येतात, हे या अभ्यासातून समोर आले आहे.
