Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

नीट मधील भ्रष्टाचारी कारभारा विरोधात अभाविपची निदर्शने.

 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी ची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी.

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेच्या निकालामध्ये गोंधळ झाल्याने देशभरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विरोधात निदर्शने केली आहेत. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर अभाविप पुणे महानगराच्या माध्यमातून तीव्र निदर्शने करण्यात आली.

नॅशनल एलिजिबिलिटी इंटरेस्ट टेस्ट म्हणजेच नीट या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला असून या निकालामध्ये 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत. यापैकी अनेक एकाच सेंटर वरील विद्यार्थ्यांना समान 720 गुण मिळाल्याने परीक्षेमध्ये काळाबाजार झालेला असून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालण्याचे काम नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगरच्या माध्यमातून फर्ग्युसन महाविद्यालयासमोर एनटीएच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.

लाखो विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशाकरिता दिवसरात्र मेहनत करून नीट परीक्षा देत असतात परंतु या निकालातून असे स्पष्ट होत आहे की या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल झालेली असून हा निकाल हा संपूर्णपणे पक्षपाती असून सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कठोरातील कठोर कारवाई केंद्र सरकारने करावी व या नीट परीक्षेचा सुधारित निकाल लवकरात लवकर जाहीर करावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे यांनी केली आहे. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत झालेल्या भ्रष्टाचाराचा निषेध व्यक्त केला. सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास या विषयात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन देशभरात करण्याचा इशारा देखील अभाविपने दिला आहे. या आंदोलनात अभाविपचे कार्यकर्ते, नीट परीक्षेचे तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading