Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण प्रेरणा देणारी – भैय्याजी जोशी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे एकमात्र राजा होते, ज्यांना श्रीमान योगी म्हटले जाते. त्यांची साधना देशभक्तीची होती तर मातृभूमीची भक्ति त्यांनी केली. कर्मशील, विवेक, चारित्र्य अशा अनेक गुणांचा समुच्चय त्यांच्यामध्ये आढळतो. त्यांची आठवण देखील प्रेरणा देणारी आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य  भैयाजी जोशी यांनी केले.

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके तरुण मंडळ यांच्या वतीने ५० वर्षांपूर्वी ३०० वा हिंदू साम्राज्य दिन शनिपार चौकात साजरा करण्यात आला होता, या उपक्रमास ५० वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्ताने ३५० वा हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्यात आला. सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते  निलेश भिसे, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश असलेकर, शरद चंद्रचूड, उमेश खळदकर, विनायक गोखले, उदय केळकर, प्रसाद भावे, प्रणव गंजीवाले, तेजस करंदीकर आदी उपस्थित होते.

निलेश भिसे म्हणाले, भगवा झेंडा हा हिंदवी स्वराज्याचा झेंडा आहे, यामध्ये कोणतीही तडजोड छत्रपती शिवाजी महाराजांनी केली नाही. काही लोक म्हणतात त्यांचे शिवाजी महाराजांचे राज्य हे सर्वधर्मसमभावाचे होते. सर्वधर्मसमभाव हे सगळे आत्ताचे शब्द आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या अनेक पत्रातून शिलालेखातून  स्पष्टपणे सांगितले आहे की हे हिंदू राष्ट्र आहे. इस्लामिक जिहाद विरुद्ध लढायला इथल्या तरुणांना प्रेरणाच मिळू नये म्हणून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या चरित्राचे विकृतीकरण करण्यात येते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, न्याय व्यवस्था  हिंदू  तत्वज्ञानानुसार होते.

ते पुढे म्हणाले, भारतीय इतिहासातला सोनेरी क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण करीत एक नूतन सृष्टीच निर्माण केली. हिंदू राजा छत्रपती झाला आणि हिंदूंचे सार्वभौम सिंहासन स्थापित झाले ही साधी गोष्ट नव्हती. शिवराज्याभिषेकाच्या माध्यमातून इस्लामी सत्तेचा अस्तित्व शिवाजी महाराजांनी झुगारून लावले.

समाजातील काही लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रश्न विचारतात की संघाने शिवाजी महाराजांसाठी काय केले? देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पोहोचवले. आरएसएसच्या प्रत्येक शाखेवर महाराजांचा फोटो असतो. संपूर्ण भारतात हिंदुत्व म्हणून कोणी प्रेरणा देत असतील तर ते शिवाजी महाराज आहेत. सगळ्या देशात शिवाजी महाराजांना पोहोचविण्याचे काम संघाने केले आहे.

मंडळाचे अध्यक्ष प्रकाश असलेकर म्हणाले, ५० वर्षांपूर्वी ३०० वा हिंदू साम्राज्य दिन शनिपार चौकात साजरा करण्यात आला होता. या उपक्रमास यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके तरुण मंडळाच्या वतीने ३५० व हिंदुस्थानराज्य दिन साजरा करण्यात आला.

प्रदीप अष्टपुत्रे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप काकडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading