Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

एकपात्री कलाकारांनी एकपात्री-बहुरूपी कला प्रकाराकडे वळावे : श्रीनिवास भणगे


पुणे : एकपात्री सादरीकरण म्हणजे कणा असणारे नाट्य होय. यात नटाचा कस लागतो. एकपात्री सादरीकरणामध्ये विचार असावा लागतो. एकपात्री सादरीकरणातून रसिकांना गुंगवून ठेवणे अपेक्षित असते. एकपात्री कलाकाराने एकपात्री-बहुरूपी या प्रकाराकडे वळून स्वत:ची प्रतिभा सिद्ध करावी, अशी अपेक्षा प्रसिद्ध नाटककार, लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास भणगे यांनी व्यक्त केली.
एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ एकपात्री कलाकार कै. मधुकर टिल्लू स्मृती आयोजित एकपात्री कला प्रसार दिन सोहळ्याचा समारोप आज (दि. 5) भणगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. 1 ते 5 जून या कालावधीत निळू फुले कला अकादमी येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत 35 कलाकारांनी एकपात्री, अभिवाचन, कथाकथन, विनोदी किस्से सादर करून रसिकांना आनंद दिला. निळू फुले कला अकादमीचे अध्यक्ष सुरेश देशमुख, एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्रचे अध्यक्ष दीपक रेगे, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू समारोप सोहळ्यास उपस्थित होते.
अनाकलनीय नातेसंबंध घटनांवर भाष्य करणारी गोष्ट एकपात्री सादरीकरणातून मांडली जाते, असे सांगून भणगे म्हणाले, एकपात्री हा शब्द वन मॅन शोवरून रुपांतरीत केला गेला आहे. पुढे याचे अनेक प्रकार पडत गेले. स्टँडअप टॉक शो हा देखील एकपात्री सादरीकरणाचाच प्रकार आहे. एकपात्रीच्या सादरीकरणातून विचारांना चालना मिळते. विविध पात्रांच्या भूमिका एकावेळी साकारताना कलाकाराचा कस लागतो. ‌‘स्किट‌’ या प्रकाराला कणा नसल्यामुळे एकपात्रीसाठी त्याची उपयुक्तता नाही. एकपात्रीमध्ये एखादा विचार सातत्याने पुढे नेत मनोरंजन किवा गंभीर बाब रसिकांसमोर मांडत गेल्यास ते उत्तम प्रकारचे सादरीकरण ठरते. या वेळी बोलताना भणगे यांनी मधुकर टिल्लू यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मान्यवरांचा परिचय एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष मंजुषा जोशी यांनी करून दिला. संदिप बेलवलकर, राहुल भालेराव, भाग्यश्री देशपांडे, संजय गोसावी यांचे सादरीकरण झाले. कलाकारांचा सत्कार श्रीनिवास भणगे यांच्या हस्ते करण्यात आला. निवेदन स्मिता कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading