पंकजा मुंडे पराभूत; बजरंग बाप्पांनी जिंकले बीड
बीड : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 7 हजार मतांनी पकंजा मुंडेंचा पराभव केला आहे.. त्यामुळे हायहोल्टेज लढतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्वाचा मानला गेला. आता केवळ सहा मतदान यंत्र मतदान यंत्र मोजणे बाकी होती. त्यामध्येही बजरंग सोनवणेंनी बाजी मारली आहे. दिवसभर अटीतटीची लढत सुरु असताना शेवटच्या फेरीत बजरंग सोनवणेंनी विजय मिळवलाय.
भाजप उमेदवार पंकजा मुंडेंकडून बीड , गेवराई विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. बीड लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढतीत 32 व्या फेरीमध्ये निकाल समोर आला होता. 31 व्या फेरीनंतर पंकजा मुंडे 400 मतांनी आघाडीवर होत्या. मात्र, शेवटच्या फेरीपर्यंत बीडमध्ये ट्वीस्टवर ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. पंकजा मुंडे यांनी 34 हजारांचा लीड घेतला होता. तो बजरंग सोनवणे यांनी 4 ते 5 फेऱ्यांमध्ये मोडित काढला होता. आज सकाळपासूनच बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत होता. बीड लोकसभा मतदारसंघ मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणामुळे अतिशय संवेदनशील बनला होता. प्रत्येक फेरीत आघाडी घेणारा उमेदवार बदलत होता. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वांत अटीतटीची लढत बीड लोकसभेत पाहायला मिळाली.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवले होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना आपल्या पक्षात खेचत उमेदवारी दिली होती. बीड लोकसभेत मतमोजणीच्या एक दिवसापूर्वी वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळालं होतं. बजरंग सोनवणे येथे थेट निवडणूक अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली होती.
बीड लोकसभा मतादरसंघातील लढत ही अत्यंत महत्वपूर्ण मानली जात होती. कारण या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या होत्या. तर बजरंग सोनवणे यांच्यासाठी देखील शरद पवारांनी ताकद लावली होती. त्यामुळं ही लढत अत्यंत तुल्यबळ मानली जात आहे.
