संशोधन समाजाला उपयोगी पडावे : कुलगुरु प्रा. डॉ. सुरेश गोसावी
पुणे : मराठी साहित्य हे आपले सांस्कृतिक वैभव आहे. साहित्यिक, लेखक, कवी, नाटककार हे द्रष्टे असतात. समाजात परिवर्तन घडवण्याची क्षमता त्यांच्यात असते. समाजाचे प्रतिबिंब साहित्यात पडलेले असते. समाजाच्या संबंधीचे विषय, प्रश्न साहित्यात मांडले जातात. त्याविषयी विश्लेषण करून साहित्यातील मूल्ये समाजापर्यंत पोहचवली पाहिजेत. संशोधन समाजाला उपयोगी पडायला हवे. असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राच्या वतीने पीएच.डी.कोर्सवर्कचे २ ते ३१ मे २०२४ दरम्यान ऑनलाइन व ऑफलाईन स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. या कोर्सवर्कच्या समारोप समारंभ प्रसंगी त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कोर्सवर्कच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण पुणे विभागाचे सह संचालक प्रा. डॉ. केशव तुपे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी स्वागत केले.
साहित्याचा अभ्यास करताना सामाजिकशास्त्रीय परिप्रेक्षातून विचार करायला हवा. साहित्यात येणारे समाज, संस्कृती, इतिहास, तत्वज्ञान, आर्थिक, राजकीय इत्यादी आंतरविद्याशाखीय अनुबंध तपासायला हवेत. असे मत डॉ. प्रभाकर देसाई यांनी व्यक्त केले.
मराठी साहित्याचे संशोधन करताना भाषिक अभ्यासाला महत्व दिले पाहिजे. कारण भाषा ही संस्कृतीचे जतन करत असते. भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल. म्हणून संशोधकांनी भाषेचे विविध आयाम शोधावेत असे आवाहन डॉ. केशव तुपे यांनी केले.
या कोर्सवर्कमध्ये प्रा.डॉ.अविनाश आवलगावकर, डॉ.अविनाश सांगोलेकर डॉ. सदानंद मोरे, प्रा. अविनाश कोल्हे, डॉ. ताहेर पठाण, डॉ. स्नेहा महांबरे, डॉ.सुधाकर शेलार, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ.सतीश बडवे डॉ. दिलीप धोंडगे, डॉ.पृथ्वीराज तौर, डॉ. केशव देशमुख, डॉ. वंदना महाजन, प्रा. योगेश बोराटे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ.महेंद्र कदम, डॉ. विजय खरे, डॉ. शरद बाविस्कर आदी मान्यवर तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले.
या कोर्सवर्कमध्ये या महाविद्यालयासह इतर महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातून ७२ संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते. विशाल हिवरखेडकर, शुभलक्ष्मी नाईक गावकर, ज्योती काळे व स्वप्नील जोशी या संशोधक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान अक्षर वाड्मय प्रकाशनाच्या डॉ. सुधाकर शेलार लिखित ‘ साहित्य संशोधन : वाटा आणि वळणे ‘ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी प्रकाशक बाळासाहेब घोंगडे उपस्थित होते.
महविद्यालयाचे डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केंद्र समनव्यक डॉ. प्रवीण ससाणे, प्रा. डॉ. नाना झगडे, डॉ. वंदना सोनवले, प्रा. अनिता गाडेकर यांनी या कोर्सवर्कचे संयोजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण ससाणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वंदना सोनवले यांनी केले तर आभार प्रा. डॉ. नाना झगडे यांनी मानले.
