हो, माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ; शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर
जुन्नर : माझा आत्मा हा अस्वस्थ आहे, पण स्वतःसाठी नाही. तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. जनतेची महागाईतून सुटका करण्यासाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन, असे सडेतोड उत्तर जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद मोदी (Narendra Modi) यांनी केलेल्या टीकेला दीले.
शिरुर लोकसभा (Shirur Lok Sabha Election) मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्या प्रचारार्थ ओतूरमध्ये शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार ऍड. राम कांडगे, दिलीप ढमढेरे, शिवसेना उपनेते बबनराव थोरात माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे, बाबा परदेशी, अनंतराव चौगुले, सुनिल मेहेर, बाजीराव ढोले, शरद चोधरी, बाळासाहेब बाणखेले, अल्लूभाई ईनामदार,अनिल तांबे, दिपक औटी, बाबू पाटे, सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर, किशोर दांगट, शरद लेंढे, सुरज वाजगे आदी उपस्थित होते.
काल पुण्यातील सभेत नरेंद्र मोदी यांनी पवारांचे नाव न घेता भटकंती आत्मा असा उल्लेख केला होता. त्यावर पवार म्हणाले की, आमच्यावरचे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही. जे माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता माझ्या बद्दल काय बोलतात. एक आत्मा भटकत आहे? हो माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ आहे. पंतप्रधान काल म्हणाले ईडी चा मी एक टक्का ही वापर करत नाही. जे चांगलं काम करतात त्यांचा विरुद्ध सत्तेचा गैरवापर केला जातो. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा. तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जाताय. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथं अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातोय.
पवार म्हणाले, मोदी नेहमीच राहुल गांधींवर टीका करतात. शहाबजादे क्या करेंगे? म्हणताना मोदींना कायतरी वाटायला हवं. राहुल गांधींच्या तीन पिढ्या देशासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी झटल्या आहेत. अधुनिकेतवर देश पुढं जावा, यासाठी लढा उभारणाऱ्या राजीव गांधींची हत्या झाली. वडील आणि आज्जींनी देशासाठी बलिदान दिलं. त्या राहुल गांधींना म्हणतात शहाबजादे काय करणार? कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली, जनतेचे प्रश्न जाणून घेतले. पण याबाबत बोलण्याऐवजी मोदी काहीही बोलतायेत. खोट्या गोष्टी सांगतआहेत. चुकीच्या पद्धतीने टीका टिपणी करत असतील. तर अशांच्या हातातून सत्ता काढून घेणं गरजेचं आहे.
