भास्कर जाधव आणि अनंत गिते यांच्यातला वाद चव्हाट्यावर
रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून कोकणात लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडाला आहे. अशातच महाविकास आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गिते यांच्या प्रचारासाठी गुहागर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव आणि अनंत गिते यांच्यातला वाद चव्हाट्यावर आला. त्यामुळे या प्रकरणानंतर आता राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे.
या सभेत अनंत गिते भाषणासाठी उभे राहिले. त्यावेळी ते म्हणाले की, मागची लोकसभा निवडणुक मी या मतदारसंघातून लढलो, पण ती तटकरे यांच्या विरोधात नाही तर मी गुहागर येथे भास्कर जाधव यांच्या विरोधात लढलो असं वक्तव्य अनंत गिते यांनी केलं. त्यानंतर अनंत गितेंच्या या वक्तव्यानंतर भास्कर जाधव यांनी हातात माईक घेत व्यासपीठावरूनच गीते यांना रोखलं.
गितेंना थांबवत भास्कर जाधव म्हणाले की, सॉरी सॉरी गीते साहेब मला असं वाटतं की तुम्ही थोडं हे बोलणं आता टाळलं पाहिजे. त्याचं कारण असं तुमचे हे जे खाली चेले चपाटे आहेत. ते वेगळ्या अर्थाने प्रचार करत आहेत. आत्तासुद्धा दोन व्यक्तींनी सांगितलं की भास्कर जाधव गीतेंच्या विरोधात आहेत, पण मी कोण विरोधात, मी जेव्हा ज्या पक्षात होतो. त्या पक्षाचं काम करत होतो. तेव्हा आता हे जमलं तर बदला. त्याची परिणीती अशी होते की भास्कर जाधव गीते यांच्या विरोधात आहे. असा मेसेज जात आहे. अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी गीते यांना व्यासपीठावरूनच सुनावलं.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मी पक्षात राहुन कधीही गद्दारी केलेली नाही, जसा अनुभव मी चिपळूणमध्ये निष्ठावतांचा घेतला आहे, म्हणजे पैसे प्रभाकर शिंदेंचे आणि मत रमेश कदम यांना ही निष्ठा माझ्याकडे नाही, अशा शब्दातच गुहागर तालुक्यात आयोजित प्रचार सभेत सुनावले. त्यानंतर अनंत गिते म्हणाले की, तुम्ही माझं पुढचं वाक्य ऐकलं नाही. यालाही प्रत्युत्तर देत जाधव म्हणाले की, मी तुमची सगळी भाषा ऐकली आहेत. त्यानंतर गीते पुढे म्हणाले की, या मतदारसंघात तटकरे यांचं काही आहे का नाही ? त्यामुळे आता भास्कर जाधव आणि अनंत गिते एक आहेत. यानंतर जाधव यांनी वेळ सावरून नेत गीते यांच्या विधानानंतर आता टाळ्या वाजवा असं सांगितलं अन् पुढे गितेंचं भाषण सुरू झालं.
