Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

कोळी बंधवांप्रती सुनील ताटकरेंनी व्यक्त केली कृतज्ञता

रायगड : लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील मतदारसंघात राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसते. रायगड लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे संपूर्ण मतदार संघ पिंजून काढत आहेत.  माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला… येणार्‍या संकटांना सामोरे जावून पुन्हा त्याच ताकदीने उभा राहतो. सर्वाधिक चलन माझ्या याच मच्छीमार बांधवांकडून मच्छीमारी व्यवसायातून देशाला मिळत आहे.  असे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे नेतृत्व करत स्वराज्याचे रक्षण याच कष्टकरी समाजाने केले त्याबद्दल सुनील तटकरे यांनी  कृतज्ञता व्यक्त केली.

महायुतीच्यावतीने कोळी समाज महासंघाचा भव्य मेळावा रेवदंडा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी तटकरे बोलत होते.  यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, माझ्या मच्छीमार बांधवांचा डिझेलचा परतावा यापुढे कधी थकीत राहणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तसेच नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर आणि मी केंद्रात खासदार म्हणून गेल्यानंतर केंद्रसरकारच्या माध्यमातून अनेक योजना मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी राबवल्या जातील, असा शब्दही तटकरे यांनी यावेळी दिला. अलिबाग मतदारसंघासाठी जयंत पाटील यांनी जितका निधी आणला नाही त्यापेक्षा तिप्पट निधी आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मतदारसंघात आणल्याचेही तटकरे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

तसेच,  शेकापच्या जयंत पाटील हे  शरद पवारसाहेबांना घेऊन मोर्बा या गावी आले होते. परंतु त्या सभेला जिल्हयातील लोक आणूनही गर्दी झाली नाही इतकी गर्दी फक्त रेवदंडा मच्छीमार, कोळी बांधवांनी केली आहे हे सांगत, जयंत पाटील तुम्ही नितीमत्ता, राजकारण आणि अक्कल आम्हांला शिकवू नका, असे खडेबोल सुनावतानाच स्वतःचे आत्मपरीक्षण करा… तुमचा बालेकिल्ला म्हणता मग तुम्ही पिछाडीवर का गेलात यावर विचार न करता माझ्यावर टिका का करता, असा सवालही सुनील तटकरे यांनी केला.

या मतदारसंघात ४ जूनला घड्याळयाचा गजर ऐकायला मिळेल आणि विधानसभेला महेंद्र दळवी यांच्या धनुष्यबाणावर सर्वाधिक मताधिक्य असेल, असे सांगतानाच यावेळी पहिल्यांदा घड्याळ या चिन्हासमोरील बटण तुम्हाला दाबायचे आहे. त्यामुळे उद्याच्या भविष्यात या भागाचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading