fbpx
Sunday, May 26, 2024
Latest NewsPUNE

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद म्हणजे माणूसपणाची घेतलेली दखल – अविनाश धर्माधिकारी

पुणे : डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नजरेच्या माध्यमातून होणारा संवाद महत्त्वाचा आहे. डॉक्टर आणि रुग्णांमधील संवाद म्हणजेच माणूसपणाची घेतलेली दखल आहे. काही डॉक्टर असे असतात की, त्यांच्याकडे पाहिल्यावरच अर्धे आजार बरे होतात. परंतु डॉक्टरांना मारहाणीचे प्रसंग होताना दिसतात. वैद्यकीय क्षेत्राचे व्यापारीकरण झाले आहे. अनेकदा रुग्णांकडे माणूस म्हणून नाही तर रुग्ण म्हणूनच पाहिले जाते, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

आनंद प्रकाशन आणि चिन्मय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. राधा संगमनेरकर लिखित ‘झेप यशाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. रमेश भोसले, डॉ.अमोल अन्नदाते, लेखिका डॉ.राधा संगमनेरकर, डॉ अभिजित अन्नदाते आदी उपस्थित होते.

अविनाश धर्माधिकारी म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीसमोर आदर्श ठेवण्यात आला आहे. पुस्तकातील अनेक घटना वाचल्यावर हे पुस्तक वेदनादायी परंतु आपले ज्ञान वाढवणारे आहे, असे लक्षात येते. विश्वाची माऊली काय काय सोसून विश्वाला वाढवत असते याची प्रचिती पुस्तकातून येते.

ते पुढे म्हणाले, तरुणांनी आठवड्यातले सहा दिवस दररोज १६ तास काम केले पाहिजे. कामात बदल हाच आराम असला पाहिजे. तरुणपणात काम केले तरच आयुष्यभराचा मजबूत पाया निर्माण होईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. रमेश भोसले म्हणाले, एका शिक्षकाला आपला विद्यार्थी कसा घडावा असे वाटते त्याच प्रकारे राधा संगमनेरकर यांचे काम आहे. एक डॉक्टर काय करू शकतो याची प्रचिती त्यांच्या कामातून येते. निस्पृह आणि नीतिमत्तेने त्यांनी रुग्णांची सेवा केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. राधा संगमनेरकर म्हणाल्या, ग्रामीण भागात मी काम करत होते प्रत्यक्ष अनुभवासाठी विविध हॉस्पिटलमध्ये काम केले आणि शेवटी आपल्या गावातील लोकांना सेवा मिळावी म्हणून गावी हॉस्पिटल उभारले. पुस्तकी ज्ञानाला व्यवहारात ज्ञानाची जोड मिळेल आणि एक चांगला डॉक्टर होण्यासाठी या पुस्तकातून प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी गीता भुर्के यांनी गणेशवंदना सादर केली. डॉ. श्याम भुर्के यांनी सूत्रसंचालन केले. डॉ मुकुंद संगमनेरकर यांनी आभार मानले. डॉ सई संगमनेरकर यांनी पसायदान म्हटले.. श्रोत्यांची फार मोठी उपस्थिती होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading