पश्चिम महाराष्ट्रातील १५० गावात भूमी सुपोषण-संरक्षण अभियानाचा संकल्प
पुणे – गेल्या दोनशे वर्षांतील जमिनीबद्दलचा दृष्टिकोन बदलला असून जमीन केवळ आर्थिक संसाधन मानली गेली आहे.जास्तीत जास्त उत्पादन हे उद्दिष्ट बनत असून त्यामुळे पृथ्वीमातेचे शोषण सुरू आहे.सध्या आपल्या जमिनीची स्थिती चिंताजनक आहे. आज देशात ९६.४० दशलक्ष हेक्टर जमीन आहे. त्यातील आपल्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या जवळपास ३० टक्के क्षेत्र नापीक आहे. हे चित्र सुधारण्यासाठी अक्षय कृषी परिवाराच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रांतात १५० गावांमध्ये पुढील महिन्यात भूमी सुपोषणासाठी भूमीचे पूजन आणि व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे अशी माहिती कृषीभूषण जगन्नाथ मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गोसेवा गतीविधी प.महाराष्ट्र प्रांत गो-आधारीत शेती सहप्रमुख पूनमताई राऊत उपस्थित होत्या.
ते पुढे म्हणाले की,भारतातील शेतजमिनीची घटती कार्बन पातळी वाचविण्यासाठी आणि जमीन नापीक होत चालली आहे, यासाठी देशातील विविध प्रमुख संस्थांनी एकत्र येऊन भूमी सुपोषणासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यात भारतातील हजारो गावांमध्ये भूमिपूजन कार्यक्रमाद्वारे मृदा पोषण आणि संवर्धन कार्याला चालना देण्यात आली आहे.2021 पासून जमीन पोषण आणि संवर्धनासाठी राष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक मोहीम सुरू केली होती.या सार्वजनिक मोहिमेत कृषी आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून भारतातील हजारो गावांमध्ये भूमिपूजन कार्यक्रमाद्वारे मृदा पोषण आणि संवर्धन कार्याला चालना देण्यात आली आहे.सध्या सर्वत्र उपलब्ध पाणीसाठा दिवसेंदिवस कमी कमी होत चालला असून पुढील पाच वर्षात आपण नैसर्गिक शेती करण्याचा मार्ग स्वीकारला नाही तर पाणी उपलब्धतेची समस्या अजून गंभीर बनेल.असेही ते म्हणाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी जमिनीबाबत जागरूक होऊन रसायनमुक्त शेतीकडे वळणे आवश्यक आहे.
शेतजमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक संतुलन बिघडत असून, जमिनीतील वाढत्या प्रदूषणामुळे पुढील काही वर्षांत उत्पादनावर विपरीत परिणाम होणार असल्याची चिंता कृषी आणि पर्यावरण क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी अनेकदा व्यक्त केली आहे.
संकटाच्या रूपाने उत्पादनावर विपरीत परिणाम होईल. जमिनीतील सेंद्रिय कार्बन किमान आवश्यकतेपेक्षा खूप खाली घसरला आहे. त्यामुळे देशाच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी या संस्थांनी मृदा पोषणाच्या माध्यमातून सकारात्मक बदलाचा विडा उचलला आहे,असे ते म्हणाले.
अभियानाची गरज
रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आपल्याला जाणवत आहेत, सर्वांच्या आरोग्यावर त्यांचा विपरीत परिणाम होत असून मानावाबरोबरच जनावरांना सुद्धा त्याचा त्रास होत आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण खात असणारी प्रत्येक गोष्ट रासायनिक होत चालली आहे. झटपट पिकाच्या नादात मात्र आपल्याला अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी आपलीच भूमी सुपीक, सुपोषित असणे आपले कर्तव्य आहे या भावनेतून शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
अभियानाची माहिती
भारतात हजारो वर्षांपासून शेती होत आहे. प्राचीन शेतीमध्ये नैसर्गिक संसाधने म्हणजे पाणी, शेण आणि गोमूत्र आणि सूक्ष्मजीवांच्या मदतीने पृथ्वी आणि पिकाची गुणवत्ता राखण्याची परंपरा आहे. वेद काळापासून जमीन आपली आई आहे असे आपण मानतो. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन भूमी सुपोषण करण्याचा संकल्प करण्यात येत आहे.अशी माहिती यावेळी पूनमताई राऊत यांनी दिली. गावातील भूमिपूजन सोहळ्यासाठी जागा निश्चित करून पूजनाच्या एक दिवस आधी सर्व शेतकरी बांधवांनी घरातील स्वतःच्या शेतातील मूठभर माती आणावी.कुटुंबासह पूजास्थळी माती नेऊन त्यावर सर्वांनी आणलेली माती एकत्रित करून विधिवत पूजा करण्यात येणार आहे. तसेच देशीगाय वासराची पूजा सुद्धा करण्यात येणार आहे.स्वतःचे,राष्ट्राचे आणि पृथ्वीमातेचे हित जोपासण्यासाठी नैसर्गिक, गो आधारित शेती करण्याचा संकल्प यावेळी कुटुंबांसह शेतकरी करणार आहेत. पश्चिम महारष्ट्र प्रांतात पुढील महिनाभरात असे १५० गावांमध्ये भूमी पूजन आणि नैसर्गिक शेतीसाठी संकल्प करून कीटकनाशक विरहित शेतीसाठी प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे,असे त्या म्हणाल्या.
हजारो वर्षांपासून भारत समृद्ध आहे,हे एक समृद्ध, पर्यावरणप्रेमी राष्ट्र आहे. याची जाणीव ठेऊन नैसर्गिक शेतीसाठी आणि सर्वांचे आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांना जनजागृती करण्याची मोहीम सुरु आहे. निरोगी पिके, निरोगी मानव आणि निरोगी समाजाची निर्मिती निरोगी मातीतून होऊ शकते,अशीही माहिती त्यांनी दिली.
मगर यांनी यावेळी नैसर्गिक शेतीद्वारे यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांच्या अनुभवांची माहिती दिली तर गो आधारित शेतीचे आरोग्यदायी फायदे राऊत यांनी यावेळी सांगितले.
पंचगव्य औषध पद्धती ही पर्यायी औषध प्रणाली म्हणून अतिशय प्रभावी आहे. हे अनेक असाध्य रोगांवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहे. देशात रासायनिक खतांचा अंदाधुंद प्रयोगांमुळे आणि कीटक नियंत्रकांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. विषारी रसायनांच्या वापरामुळे कर्करोगासारखे आजार सातत्याने वाढत आहेत. 2016 मध्ये देशातील सुमारे 6 कोटी मातीच्या नमुन्यांच्या चाचणीच्या अहवालात असे आढळून आले की सेंद्रिय कार्बनचे प्रमाण आता केवळ 0.05 टक्के आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
या उपक्रमात देशभर गायत्री परिवार, पतंजली योगपीठ, रामकृष्ण मिशन, इस्कॉन, रामचंद्र मिशन, सिद्धगिरी मठ, पिराणा पीठ, स्वदेशी जागरण मंच,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, सहकार भारती,विद्या भारती, एकल विद्यालय, राष्ट्रीय सेवा भारती, सेंद्रिय शेती परिवार, ग्राम भारती, लोकभारती, ग्राम विकास, गोसेवा, पर्यावरण उपक्रम, दीनदयाळ संशोधन संस्था, एकलव्य फाऊंडेशन बन्सी, गीर गोशाळा, युथ फॉर नेशन आदी ग्रामीण भागात काम करणाऱ्या ४० संस्थांचा सहभाग आहे. ही मोहीम चैत्र शुक्ल प्रतिपदा या भूमीच्या जन्मदिवसापासून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात अक्षय तृतीया पर्यंत तसेच वर्षभर हा उपक्रम आणि भूमिपूजन कार्यक्रम होणार आहेत. अभियानाचे समन्वयाचे काम अक्षय कृषी परिवार करणार आहे..
