अगोदर काय घडले हे विसरुन जा आणि उद्याचा उष:काल येण्यासाठी काम करुया; सुनील तटकरे यांचे आवाहन
रायगड : आज राजकारणात अनेक स्थित्यंतरे घडल्यानंतर महायुती ही भक्कमपणे उभी राहिली आहे. आता माझ्या प्रचाराची धुरा महायुतीच्या सर्व नेत्यांनी खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे या अगोदर काय घडले हे विसरुन जा आणि उद्याचा उष:काल येण्यासाठी काम करुया, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी पेणवासीयांना केले.
पेण शहरातील आगरी समाज सभागृहात महायुतीची जाहीर सभा पार पार पडली यावेळी तटकरे बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार रविंद्र पाटील, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार धैर्यशील पाटील,आरपीआयचे एम. डी. कांबळे आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना तटकरे म्हणाले, रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास केला असून त्यामध्ये पेण मतदारसंघात महायुतीची सर्वाधिक एकत्रित ताकद आहे. जवळपास ८५ ते ९० टक्के मतदान महायुतीचे आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला ‘घड्याळ’ या चिन्हावर मतदान करायचे आहे. पुढील पाच वर्षे महायुती बळकट आणि मजबूत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासकामांसाठी माझी साथ मिळेल असा शब्द दिला. वैचारिक लढा आपण लढत आलो आहोत पण शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अशी आपली जुळवणूक कधी बघायला मिळाली नाही. मात्र महायुतीच्या माध्यमातून ती भक्कमपणे बघायला मिळत आहे.
एकहाती सत्ता कुणाला कधी मिळाली नाही. मात्र देशात नेहरू – गांधी परिवारानंतर एकहाती सत्ता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशात अनुभवायला मिळत आहे. आज एकहाती सत्तेमुळे विकसित राष्ट्रांमध्ये आपला पहिल्या सातमध्ये नंबर आहे याचे सर्व श्रेय नरेंद्र मोदी यांना जाते. एनडीएचे सरकार येईल आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील व गौरवशाली भारताची वाटचाल सुरू राहिल असेही तटकरे म्हणाले.
