fbpx
Sunday, May 26, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचे अनेक प्रयत्न केले; दीपक केसरकर यांचा आरोप

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न सातत्याने केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे हे पवारांच्या जाळ्यात फसल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपावर ते खोटे-नाटे आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी केले.

भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीतर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत  केसरकर बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते आणि मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महायुतीचे समन्वयक आ.प्रसाद लाड, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा असलेल्या शिवसैनिकांनी पवारांच्या भुलथापांना बळी पडू नये, असेही  केसरकर यांनी नमूद केले. केसरकर म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात अनेक बेताल आरोप केले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा असणार्‍या शिवसैनिकांनी वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच शिवसेनेत फूट पाडली, हे जगजाहीर आहे. 2014 नंतर ही अनेक घडामोडीत पवार यांनी शिवसेनेसारखी लढाऊ संघटना कशी संपेल, या दृष्टीनेच प्रयत्न केले. यावेळी  केसरकर यांनी गेल्या 10 वर्षातील अनेक राजकीय घडामोडींवेळी पडद्यामागे घडलेल्या घटनांचा संदर्भ देत पवार यांचा शिवसेनेबद्दलचा आकस, द्वेष दाखवून दिला.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्वबळावर बहुमत मिळाले नाही, हे पाहून पवार यांनी भारतीय जनता पार्टीला न मागताच पाठिंबा जाहीर केला. त्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ नयेत, या इच्छेमुळेच पवार यांनी भाजपा ला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता, असे केसरकर यांनी नमूद केले. 2017 मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेबरोबर असलेली युती कायम राहिली पाहिजे, अशी भूमिका ठामपणे मांडली होती. पवार यांनी त्यावेळी शिवसेना बरोबर असेल तर आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही, शिवसेनेबरोबरची युती तोडली तरच आम्ही तुमच्या बरोबर येऊ, असे भाजपा नेतृत्वाला कळवले होते. यावेळीही पवारांचा शिवसेनेबद्दलचा आकस दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते या घडामोडींचे साक्षीदार आहेत, असे  केसरकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, 2019 मध्येही पवारांची भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची इच्छा होती. मात्र त्या वाटाघाटी फिसकटल्याने त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला साथीला घेत सरकार बनवले. शिवसेना संपल्याखेरीज राष्ट्रवादी वाढणार नाही, असा पवार यांचा समज असल्याने त्यांनी नेहमीच शिवसेनेचे पाय ओढण्याचे राजकारण केले. आता याच पवारांनी राजकीय स्वार्थासाठी भाजपा विरोधात अपप्रचार सुरू केला आहे. दर दोन दिवसांनी महायुतीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन मविआ नेत्यांची पोलखोल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading