अंडरवॉटर डोमेन क्षेत्रात मोठ्या आर्थिक संधी – भारताचे माजी संरक्षण सचिव डॉ अजय कुमार यांचे प्रतिपादन
पुणे : “पृथ्वीवरील ९४ टक्के जीवसृष्टी ही समुद्रामध्ये आहे, असे मानले जाते. मात्र, चंद्र आणि मंगळ या दोन ग्रहांवर भारताने जे काही संशोधन केले आहे त्याच्यापेक्षा खूप कमी संशोधन हे आजवर अंडरवॉटर डोमेन या क्षेत्रामध्ये झाले आहे ही काळजी करण्यासारखी बाब आहे. अंडरवॉटर डोमेन अर्थात जल पृष्ठभागाखालील क्षेत्राचे अनेक कंगोरे असून यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक संधी दडलेल्या आहेत, असे प्रतिपादन भारताचे माजी संरक्षण सचिव डॉ अजय कुमार यांनी केले. नजीकच्या भविष्यामध्ये हे क्षेत्र नवा आयाम घेऊन उदयास येणारे क्षेत्र असेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस अर्थात युडीए या क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या पुण्यातील मेरिटाईम रिसर्च सेंटर (एमआरसी)च्या वतीने आणि इंडो- स्वीस सेंटर ऑफ एक्सलन्स व नीरध्वनी टेक्नॉलॉजीज यांच्या विशेष सहकार्याने ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस फ्रेमवर्क फॉर स्ट्रॅटेजिक सिक्युरिटी आर्किटेक्चर अँड आत्मनिर्भरता’ या महत्त्वाच्या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय कार्यशाळे दरम्यान डॉ अजय कुमार बोलत होते.
सेनापती बापट रस्त्यावरील एमसीसीआयएच्या नवलमल फिरोदिया सेमिनार हॉल मध्ये सदर कार्यशाळा संपन्न होत असून यावेळी डॉ कुमार यांनी ‘धोरणात्मक सुरक्षा आणि नवसंकल्पना’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
एमआरसीच्या धोरणात्मक सल्लागार समितीचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी बी शेकटकर, एमआरसीचे सल्लागार प्रफुल तलेरा आणि एमआरसीचे संस्थापक संचालक कमांडर डॉ अर्नब दास आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ अजय कुमार म्हणाले, “अंडरवॉटर डोमेन अर्थात जल पृष्ठभागाखालील क्षेत्रासंबंधी जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज झाली असून या क्षेत्रात असलेल्या छुप्या संधी आणि या क्षेत्राची क्षमता ओळखणे भारतासाठी महत्त्वाचे झाले आहे. अंडरवॉटर डोमेनमधील संधीवर आपण लक्ष केंद्रित करायला हवे आहे. आपण जर असे केले नाही तर इतर देशांशी तुलना केल्यास आपण त्यांच्या मागेच राहू. महासागर हे हरितगृह वायूंच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. जीवसृष्टी सुरू राहणार आहे की नाही हे हरितगृह वायू ठरवतात असे म्हटल्या जाते. याचे व्यवस्थापन करायचे असल्यास आपल्याला महासागरांचे व्यवस्थापन करावे लागेल. भूभागाप्रमाणेच आपले सागरी क्षेत्रही आपल्याला अनेक संसाधने पुरवीत असते. मात्र आपल्या जीडीपीमध्ये त्याचे योगदान फक्त ४% इतके आहे हेही लक्षात घ्यायला हवे आहे.”
धोरणात्मक सुरक्षेच्या संदर्भात बोलताना डॉ कुमार म्हणाले, “सॉफ्टवेअर आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) यामध्ये आपली क्षमता ही महासागराचा अभ्यास, पर्यटन, शिपिंग, मत्स्यपालन आदी विषयांसाठी नक्की वापरली जाऊ शकते. मात्र त्या ही पुढे जात उपलब्ध डेटाचे विश्लेषण करून त्यावर उपाय शोधण्याची खरी गरज आपल्याला आहे. लाखो नोकऱ्या निर्माण करण्याची आणि सागरी संसाधनांचा लाभ घेत अब्जावधींचा महसूल निर्माण करण्याची क्षमता या क्षेत्रात आहे हे विसरता कामा नये.”
एआयच्या मदतीने या क्षेत्रातील भविष्यदर्शक तंत्रज्ञान तयार करण्यामध्ये आपण निश्चित चांगले काम करू शकतो. पाण्याखालील सोनार, रडार इत्यादी तंत्रज्ञानाच्या विकासात आपण कमी पडत असून सेमीकंडक्टरमधील विकासावर देखील आपण भर द्यायला हवा आहे, असे डॉ कुमार यांनी सांगितले.
पंतप्रधान गतिशक्ती योजनेप्रमाणे आता अंडरवॉटर डोमेन क्षेत्रासाठी देखील युडीए गतिशक्ती कार्यक्रम सुरू करण्याची आज गरज असून याद्वारे अंडरवॉटर डोमेन अंतर्गत येणारा सर्व डेटा एकाच फ्रेमवर्कमध्ये एकत्रित करण्यास मदत होईल. शिवाय विविध कारणांसाठी हा एकत्रित वापरणे देखील शक्य होणार असल्याकडे डॉ कुमार यांनी लक्ष वेधले.
आज भारतीय महासागराबद्दल भारतीयांपेक्षा चीनने जास्त संशोधन केले आहे, असे सांगत डॉ कुमार म्हणाले, “देशात स्मार्ट शहरांप्रमाणेच आता सागरी क्षेत्रात ‘स्मार्ट रिजन’ उभारण्यावर आपण भर द्यायला हवा आहे. जेव्हा या सागरी स्मार्ट रिजनच्या संकल्पनेवर आपण काम करू तेव्हा या क्षेत्रात आपल्या पुढे असलेल्या देशांशी आपण स्पर्धा करू शकू. इतकेच नव्हे तर स्मार्ट रिजनचे यश हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल. इतर सर्व देशांशी स्पर्धा करायची असल्यास आपल्याला आपली गती निश्चितच वाढवावी लागणार आहे.”
समुद्रमार्गे होणारी आक्रमणे ज्या प्रकारे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत त्याच प्रकारे आता नदीमार्गे उभे राहणारे राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी बी शेकटकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह बदलत चीन नेमके हेच करीत आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
एमआरसीचे संस्थापक संचालक कमांडर डॉ अर्नब दास यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि आभार मानले.
