भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारा —डॉ. पंडित विद्यासागर
पुणे :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारून आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी प्रगती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या आणि विज्ञानाच्या सहाय्याने स्वत:चा जीवनस्तर उंचावून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत संत ज्ञानेश्वर सभागृहात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. वैज्ञानिक पद्धतीने विचार करून सामाजिक प्रश्नांना सामोरे जाण्याची खरी गरज आहे, असे डॉ. विद्यासागर यांनी यावेळी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठ आवारातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास कुलगुरु प्रा.डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, संदीप पालवे, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, डॉ. हर्ष जगझाप, मुकूंद पांडे आदी मान्यवरांनी बाबासाहेबांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विवेकशील वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्रात सहज प्रगती साध्य करता येते. कारण त्यांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन आधुनिक आणि खुप प्रगल्भ आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव हि मानवी मूल्ये स्वीकारलेला स्वाभिमानी आधुनिक समाज बाबासाहेबांना अभिप्रेत असून असा समाज उच्चशिक्षणाद्वारे निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे कुलगुरु प्रा.डॉ. सुरेश गोसावी यांनी अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन केले. याप्रसंगी जयंतीदिनानिमित्त विद्यापीठाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ आवारातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अशी भव्य मिरवणूक काढून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.
