Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

“केंद्रात मंत्री राहिला, परंतु या माणसाने फुटकी कवडीही मतदारसंघात आणली नाही”, तटकरेंकडून अनंत गितेंची खरडपट्टी

रायगड :  रायगड लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेनेमधून अनंत गीते लढले. मोदींच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. त्यांना या मतदारसंघात प्रचंड रोजगार निर्माण करता आला असता, परंतु त्यांनी ते केले नाही. पाच वर्षे अवजड उद्योग खाते होते. परंतु फुटकी कवडीही या माणसाने मतदारसंघात आणली नाही. अशी खंत महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांनी बोलून दाखवली. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील रोहा तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी माजी मंत्री अनंत गिते यांची चांगलीच खरडपट्टी काढला. दरम्यान माझ्याकडे राज्याचे ऊर्जामंत्री पद आठ महिन्यासाठी आले त्यावेळी या राज्यातील वीज दर कपात करून जनतेला दिलासा दिला होता. याची आठवणही गिते यांना तटकरेंनी आवर्जून करून दिली.

पुढे बोलतांना ते म्हणाले की,  रायगड जिल्हा हा विचारांचा बालेकिल्ला आहे. गेली ४० वर्षे मी तुमच्यासोबत राजकारणात सक्रीयपणे काम करत आहे. मात्र जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. कितीही संभ्रम निर्माण केला तरी अल्पसंख्याक समाजातील लोकांशी माझे असलेले सौहार्दपणाचे संबंध लक्षात घेता या समाजाची ताकद मोठ्या प्रमाणात पाठीशी उभी राहणार आहे. तरुणाईची फळी आणि महिलांच्या सोबतीने रायगड लोकसभा मतदारसंघ पिंजून काढा. अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. सर्वाधिक मताधिक्य कसे मिळेल याकडे लक्ष द्या असे आवाहन सुनील तटकरे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले.

महाविकास आघाडीचे सरकार आले.  त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर कुणबी समाजोन्नती संघाचा भूखंड मुंबईत उपलब्ध असल्याची माहिती समाजाच्यावतीने आम्ही भेट घेऊन घातली होती. कुणबी समाजाने त्यासाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली मात्र अजितदादा पवार यांनी मी दिल्लीत अधिवेशनाला असताना पाच कोटी रुपये दिले. हे पाच कोटी रुपये लगेचच त्यांच्या बँक खात्यात जमाही करण्यात आले. कुणबी समाजाची वास्तू मुंबईत उभी राहिली हे ४२ वर्षाचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले याचा मला अभिमान आहे असेही त्यांनी सांगितले.

 दरम्यान, टप्प्याटप्प्याने आपली विकास कामे पूर्ण करायची आहे. ४० वर्षांच्या राजकीय जीवनात मला जशी साथ दिली. ज्या ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात. तशीच साथ पुन्हा एकदा तुम्ही द्याल आणि या तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपण सगळेजण मी १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करतानाच सन २०१९ मध्ये तुम्ही घडवलेला विक्रम मोडून नवीन विक्रम घडवाल व असेच प्रेम कायम ठेवाल असेही त्यांनी सांगितले. यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे,  विनोद पाशिलकर, सुरेश मगर, भाई देशमुख, अनंत देशमुख, नंदू म्हात्रे, संतोष भोईर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading