शहराच्या मध्यभागात मातृशक्ती, शौर्य रथांसह पुणेकरांनी काढली भव्य शोभायात्रा
पुणे : विविध क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार मिळविलेल्या महिलांच्या कार्याची महती सांगणारा मातृशक्ती रथ… छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा असलेला शौर्य रथासह भारत माता की जय… छत्रपती शिवाजी महाराज की जय…च्या घोषणा देत पारंपरिक वेशात सहभागी झालेले पुणेकर, अशा उत्साही वातावरणात शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा ते श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी रा.स्व.संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर, सहसंयोजक अश्विन देवळणकर यांसह माजी महापौर मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, हेमंत रासने, गायत्री खडके, कुणाल टिळक, नवनीत मित्र मंडळ अध्यक्ष संतोष फडतरे, भाऊ रंगारी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, अमित पळसकर, निलेश खडके, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे शेखर मुंदडा, सुनील देवधर यांसह कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी शोभायात्रेला प्रारंभ झाला. प्रबोधन मंच रथ, भजनी मंडळ, मातृशक्ती रथ, छत्रपती शिवाजी महाराज रथ, बँड, मर्दानी खेळ, वेत्रचर्म पथक देखील सहभागी झाले होते. मतदानाचे महत्व पटवून देत मतदान जनजागृतीकरिता सहभागी झालेला विशेष रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
पुणेकरांनी देखील भगव्या टोप्या, भगवे फेटे घालून, धर्मध्वज (भगवा) हातात घेऊन उत्साहाने सहभाग घेतला. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून निघालेल्या शोभायात्रेचा समारोप तुळशीबाग राम मंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या घराण्यातील अनिल जेधे, राजाभाऊ भिलारे, मारुती गोळे, रुपाली देशपांडे या वंशजांच्या हस्ते ग्रामगुढी देखील उभारण्यात आली. सूत्रसंचालन अमोघ वैद्य याने केले, तर यात्रा प्रमुख म्हणून चैतन्य कुसुरकर, अथर्व दातार व अथर्व पाठक यांनी नियोजन केले.
