Sunday, September 20, 2026
Latest NewsPUNE

तुळशीबागेतील श्रीराम-लक्ष्मण-सीता मूर्तीस गुढीपाडव्यानिमित्त पवमान अभिषेक

श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सवाला प्रारंभ ; उत्सवाचे २६३ वे वर्ष

पुणे :ऐतिहासिक तुळशीबाग श्रीराम मंदिरात श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरूषसूक्त पठणासह राम नामाच्या जयघोषात श्रीराम-लक्ष्मण-सीता मूर्तीस पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर मूर्तींना पोशाख व दागिने घालण्यात आले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी सकाळपासून मंदिरात गर्दी केली होती.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने दि. ९ ते २७ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६३ वे वर्ष साजरे होत आहे.

मंगळवारी दुपारी १२ वाजता श्रीरामांची महापूजा व आरती, सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक व आरती, महापूजा झाली. दि. ९ ते २३ एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी ५.१५ वाजता प्रवचनकार मोहना चितळे यांचे प्रवचन होणार आहे. तसेच मंदिरात श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, सांगितीक कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading