Loksabha Election : ‘त्या’ वक्तव्याबद्दल अर्चना पाटलांकडून स्पष्टीकरण
धाराशीव : धाराशीव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. यातच बार्शी येथे प्रचारासाठी आले असता त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संदर्भात एक कथित विधान केलं होतं. त्यानंतर राज्यात महायुतीकडून तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या. यातच आता त्या विधानावर अर्चना पाटील यांच्याकडून अधिकचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
अर्चना पाटील म्हणाल्या की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून प्रसारित केलेली माझी प्रतिक्रिया तोडून-मोडून दाखवली गेली आहे. ज्या मतदारसंघात आमचे महायुतीचे सहकारी आमदार आहेत. तिथे वर्चस्व वाढवण्याबाबत मला प्रश्न विचारला होता. त्यावर मी महायुतीची उमेदवार असताना आणि राजाभाऊसारखा भाऊ खंबीरपणे माझ्या पाठीशी असताना तिथे माझं वर्चस्व मतदारसंघात का वाढवू असं म्हणाले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, माझ्या उत्तराला अर्धवट तोडून माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला आणि चुकीच्या पद्धतीने ते मांडलं गेलं, असेही अर्चना पाटील यांनी स्पष्ट केलं आङे. तसेच मी राष्ट्रवादीची आणि पर्यायाने महायुतीची उमेदवार आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे. असेही त्या म्हणाल्या.
