रिझर्व्ह बँकेकडून कर्जदारांना दिलासा; रेपो रेटमध्ये काहीही बदल नाही
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आर्थिक वर्ष 2024-25 चे पहिले पतधोरण जाहीर केले आहे. फेब्रुवारीच्या पतधोरणात मध्यवर्ती बँकेने सलग सहाव्यांदा रेपो दर 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवला होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वी आरबीआय रेपो दर स्थिर ठेवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आज आरबीआयने पतधोरणाच्या बैठकीत सलग सातव्यांदा आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली चलनविषयक धोरण समितीची बैठक 3 एप्रिल रोजी सुरू झाली. यानंतर आज गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बैठकीचे निकाल जाहीर केले आहेत. मध्यवर्ती बँकेने पुन्हा एकदा रेपो दर कायम ठेवले असून त्यात कोणताही बदल केलेला नाही. विशेष म्हणजे आरबीआयने रेपो दरात अनेक दिवसांपासून कपात केलेली नाही. पॅनेल यावेळीही रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करणार नाही, अशी अनेक तज्ज्ञांची आधीच अपेक्षा होती. यापूर्वी मध्यवर्ती बँकेने सलग सहाव्यांदा रेपो दर 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवला होता.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या आरबीआय पतधोरण बैठकीत रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यवर्ती बँकेने सलग सातव्या पतधोरण बैठकीत रेपो दर 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. तसेच 2024-25 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 7 टक्के वेगाने वाढेल. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत GDP ची वास्तविक वाढ 7.1 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 6.9 टक्के आणि तिसऱ्या व चौथ्या तिमाहीत 7 टक्के असण्याचा अंदाज आहे, अशी शक्यात त्यांनी वर्तविली आहे.
चलनविषयक धोरणाच्या निर्णयांवर शक्तिकांत दास म्हणाले की, स्थायी ठेव सुविधा दर 6.25 टक्के आणि सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर 6.75 टक्क्यांवर कायम आहे. त्यामुळे भारताचा परकीय चलन साठा सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचला आहे. 29 मार्चपर्यंत भारताचा परकीय चलन साठा 645.6 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.
शक्तिकांत दास म्हणाले की, आरबीआय महागाई दराबाबत सावध आहे. मूळ चलनवाढीचा दर कमी झाला आहे, परंतु तो अजूनही आरबीआयने निर्धारित केलेल्या 4 टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ते नियंत्रित लक्ष्याखाली आणणे हे आमचे प्राधान्य आहे. मात्र महागाईचा दर लक्ष्याजवळ पोहोचला असल्यामुळे आणि अन्नधान्याच्या किमतीतील अनिश्चिततेमुळे महागाई वाढण्याची चिंता आहे. परंतु स्थिर गुंतवणूक आणि जागतिक वातावरणामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेला आधार मिळत आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत अन्नधान्याचा महागाई दर आरबीआयने निर्धारित केलेल्या 4 टक्के लक्ष्याच्या आत येण्याची अपेक्षा आहे आणि 3.8 टक्के राहील, असा विश्वास शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.
