Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

कथक नृत्य प्रस्तुतीने रंगला १८ व्या पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा तिसरा दिवस

पुणे : कथक गुरु डॉ मंजिरी देव यांच्या शिष्या असलेल्या मनाली देव यांच्या कथक सादरीकरणाने १८ व्या पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा तिसरा दिवस आज उल्लेखनीय ठरला.  शिवाय यानंतर सादर झालेल्या विदुषी संगीता शंकर यांच्या सुमधुर व्हायोलिनवादनाने महोत्सवाची रंगत आणखी वाढली. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं अजय पोहनकर  यांच्या गायनाने तीन दिवस सुरु असलेल्या १८ व्या पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा समारोप झाला.

उज्वल केसकर, आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झाला.

महोत्सवाचे आयोजक आणि  पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं शौनक अभिषेकी, माजी विरोधी पक्ष नेते उज्ज्वल केसकर, डॉ पूर्वा केसरक, खासदार मेधा कुलकर्णी, अंकुश काकडे, बढेकर समूहाचे प्रवीण बढेकर, आपला परिसर संस्थेचे अध्यक्ष महेश पानसे, विद्येश रामदासी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावर्षी महोत्सवासाठी बढेकर गृप आणि विलास जावडेकर डेव्हलपर्स, लोकमान्य मल्टपर्पज को ऑपरेटिव्ह बँक लि., अंशुमन टेक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. आज ज्येष्ठ टाळ वादक माऊली टाकळकर यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात मनाली देव यांच्या कथक नृत्य सादरीकरणाने झाली. त्यांनी अभिषेकी बुवांच्या ‘सर्वात्मका सर्वेश्र्वरा…’ या रचनेवर सादरीकरण करीत आपल्या नृत्याला सुरुवात केली. यानंतर त्यांनी दहा मात्रांमधील झपताल, थाट, बंदिश, उठान, आमद, तत्कार यांचे प्रभावी सादरीकरण केले.यानंतर देव यांनी तीन तालातीक पंढरपूरच्या वारीची तिहाई प्रस्तुत केली. द्रुत लयीतील काही बंदिशी आणि आपल्या गुरू मंजिरी देव यांचे कवित्त सादर केले ‘ हरी रूप एक अनेक ..’ या रचनेद्वारे दशावतार सादर करीत त्यांनी समारोप केला. त्यांना मुकुंदराज देव (तबला व पढंत), रोहित देव (तबला), श्रीरंग टेंबे (संवादिनी व गायन), गांधार भालेराव (बासरी) यांनी साथसंगत केली.

यानंतर विदुषी संगीता शंकर यांच्या व्हायोलिन वादनाने उपस्थित रसिक श्रोते तृप्त झाले. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मरणार्थ होत असलेल्या या महोत्सवात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी पंडित शौनक अभिषेकी यांची ऋणी आहे, असे संगीत शंकर म्हणाल्या. त्यांनी राग पुरीया सादर करीत आपल्या वादनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी विलंबित एकताल प्रस्तुत केला. यानंतर द्रुत तीन ताल व अति द्रुत तीन तालमध्ये त्यांनी दोन गत सादर केल्या. पंडित महादेव महाराजजी यांची ‘आज खेलो होली…’ ही होरी सादर करीत त्यांनी समारोप केला. संगीता शंकर यांना मुकेश जाधव यांनी समर्पक तबलासाथ केली.

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं अजय पोहनकर यांनी यानंतर गायन प्रस्तुती केली. त्यांनी यावेळी कौषी कानडा राग प्रस्तुत केला. यामध्ये त्यांनी विलंबित एक तालातील दोन रचना सादर केल्या. ‘काहे करत मोसे बर जोरी … ‘ या द्रुत तीन तालातील  बंदिशीने त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यानंतर त्यांनी राग जय जयवंती मध्ये द्रुत एक तालातील बंदिश सादर केली. ठुमरी सादर करीत पंडित अजय पोहनकर यांनी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचा आणि महोत्सवाचा समारोप केला.

त्यांना मुकुंदराज देव (तबला), सुधीर नायक (संवादिनी), अभेद अभिषेकी व नीरज लांडे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. रवींद्र खरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading