Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

समतेचा विचार सर्वांनी मिळून टिकवणे काळाची गरज – डॉ. बाबा आढाव

पुणे  : फुले ,शाहू ,आंबेडकर लहुजी वस्ताद साळवे , अण्णा भाऊ साठे यांनी समाजाच्या कल्याणासाठी दिलेला समतेचा विचार आज हरवत चालला असून समाजातील सर्वांनी मिळून तो विचार टिकवणे काळाची गरज असल्याचे मत जेष्ठ कामगार नेते व विचारवंत डॉ .बाबा आढाव यांनी व्यक्त केले .दलित चळवळीचे व मातंग समाजाचे अभ्यासक ,नेते भाऊसाहेब सोनवणे यांच्या नव्वदी निमित्त त्यांचा कृतज्ञता गौरव सोहळा आढाव यांच्या हस्ते पार पडला तेव्हा ते बोलत होते .
पुढे ते म्हणाले की ,भाऊसाहेब सोनवणे यांनी मातंग समाजासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे .असे समाजासाठी झटणारे व त्याग करणारे कायकर्ते आज पुन्हा नव्याने घडले पाहिजे.  तसेच आज आम्हाला या वयात अनेक आजार व शारीरिक अडचणी आहेत .पण आजही विचारांची लढाई लढण्याची ताकत आमच्यात असल्याचे आढाव यांनी उपस्थितांना सांगितले .

या कार्यक्रमास जेष्ठ दलित चळवळीचे नेते अंकल सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .यावेळी माजी मंत्री रमेश बागवे ,माजी सभागृह नेते सुभाष जगताप , झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवान वैराट ,गौरव समितीचे दयानंद अडगळे,अनिल हतागळे,अँड.महेश सकट ,नगरसेवक अविनाश बागवे ,सचिन बगाडेयासह पुणे शहरातील विविध सामाजिक पक्ष संघटनांचे नेते ,प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

महाराष्ट्रात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कार्य सर्वत्र पोहचविण्यासाठी मोलाचे योगदान भाऊसाहेब सोनवणे यांनी दिले आहे .पुणे शहरात सारसबाग येथे अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी लढा उभा केला आणि तो यशस्वी केला .त्याचबरोबर क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची संगमवाडी येथील समाधीचा व कार्याचा इतिहास मातंग समाजात पोहचविला .महाराष्ट्रातील दलित चळवळ आणि मातंग समाजात प्रबोधनाचे अतिशय ऐतिहासिक कार्य सोनवणे यांनी केले आहे असे मत माजी राजयमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केले . भाऊसाहेब सोनवणे हे मातंग समाजाचे पितामह आहेत .समाजाची राज्यात ओळख त्यांच्यामुळे झाली . त्यांचे कार्य फार महान आहे .त्यांनी कधीच कोणतीही अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्य केले तोच आदर्श आजच्या तरुण कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे असे मत माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांनी व्यक्त केले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading