चुकीच्या करात दुरूस्ती न केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा हवेली नागरि कृती समितीचा इशारा
पुणे:पुणे महापालिकेच्या विरोधात ३४ गावात जन आंदोलन करण्याचा निर्धार हवेली तालुका नागरि कृती समितीने दिला आहे. चुकीच्या मिळकत कर आकारणी मुळे या गावातील भुमीपुत्र देशोधडीला लागले आहेत. अनेकांवर मालमत्ता विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ३४ गावात जन आक्रोश आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी दिली.
कराची वसुली बंद न केल्यास गावोगावच्या पालिका कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
वडगाव बुद्रुक येथे झालेल्या कृती समितीच्या बैठकीत अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील,शेखर मोरे, संतोष ताठे, विलास मते, पोपटराव खेडेकर, अमर चिंधे, संदिप चव्हाण, अतुल दांगट, राहुल पायगुडे, संदीप तुपे, अतुल धावडे, प्रवीण दांगट, शिवाजी मते, संजय धावडे ,दिनेश कोंढरे, सुहास भोते, नितीन चांदेरे आदींसह शंभरहून अधिक पदाधिकारी, नागरिक सहभागी झाले होते. शिवणे , धायरी, नऱ्हे आदी ठिकाणी लाखोरुपयांचा मिळकत कर भरण्यासाठी पैसे नसल्याचे संतप्त कार्यकर्त्यांनी सांगितले.
समीतीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, पालिका कर वसुलीसाठी मालमत्ताना टाळे लावत आहे. आम्हीही आता गावोगावच्या कर वसुली कार्यालयाला तसेच पालिकेला टाळे लावू . गावे पालिकेत घेण्यासाठी न्यायालयात लढा दिला. मात्र पालिकेच्या सुलतानी कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. विकास ठप्प होऊन सभोवतालच्या गावात पुन्हा बकालपणा वाढला आहे. अनेकदा निवेदने देऊनही प्रशासन सुस्तावले आहे.
अडचणींची दखल घेतली जात आहे. भुमीपुत्र , कष्टकऱ्यांना कोणी वाली नाही असे चित्र आहे. नियम, कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. मिळकत करात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे भरमसाठ कर वसुली सुरू आहे.
याबाबत कृती समितीने पालिका आयुक्त विक्रमकुमार तसेच कर संकलन प्रमुख माधव जगताप यांना निवेदन दिले आहे.
मिळकत कराची आकारणी करताना नियमा नुसार मिळकतीची कर नोंदणी चटई क्षेत्रानुसार करायला हवी होती. परंतु सदर मिळकतींची ग्रामपंचायत दफ्तरी ८ अ च्या उताऱ्यास असलेले सेलेबल / बिल्टअप क्षेत्र विचारात घेऊन त्यावर १० टक्के वजावट करुन आलेले क्षेत्रफळ कर आकारणी साठी गृहीत धरले. सदर क्षेत्रफळ व मिळकतीचे चटई क्षेत्रफळ यामधे पुर्ण तफावत असून करआकारणी मधे अनाठायी वाढ झाली आहे. मिळकतींची जागेवर येऊन मोजमाप करावे,
तसेच कर आकारणी करताना वाजवी भाड्याचा दर योग्य ठरवुनच वार्षिक करपात्र रक्कम निश्चित करावी. वाजवी भाड्याचा दर लावताना शहरातील मध्यवर्ती पेठेचा दर लावण्यात आला आहे. ग्रामपंचायत काळातील कर व पालिकेच्या करात मोठया प्रमाणात तफावत आहे.पिंपरी चिंचवड प्रमाणे
समाविष्ट गावांतही शास्ती कर माफ करावे तसेच विना व्याज वार्षिक कर घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे असे श्रीरंग चव्हाण पाटील यांनी सांगितले
