मतदानाचा टक्का वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
पुणे : लोकशाहीमध्ये मतदारांचा सहभाग महत्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रियेवर भर दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित समन्वयक अधिकारी यांच्या कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अतिरिक्त विभागीय आयुक्त अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपायुक्त रामचंद्र शिंदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे आदी उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले, निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी दिव्यांग, महिला, युवक, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक, कामगार, कलावंत, साहित्यिक, नाटककार आदी सर्वांनाच मतदार नोंदणी करण्यासोबतच मतदान करण्याविषयी प्रात्सोहित करावे. महाविद्यालयासोबत बैठक घेऊन सर्व नवमतदारांच्या नोंदणीसाठी आवाहन करावे. महाविद्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या पालक सभेत मतदानाविषयी जनजागृती करावी.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान होईल, मतदानाच्यावेळी मतदान केंद्रांची माहिती होण्यासाठी मतदान माहिती पत्रिकेचे वितरण होईल, याची दक्षता घ्यावी. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार संघामध्ये दिव्यांग, महिला, एकमेवाद्वित्तीय अशी आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी.
अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्राला पोलीस विभागासोबत भेटीचे आयोजन करुन आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांना मतदार नोंदणीप्रसंगी प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात. महिला मतदारांची नोंदणी करुन मतदान जनजागृतीपर मेळावे आयोजित करण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत करावेत.
मतदार यादीच्या माहितीचे (डाटा) दर आठवड्याला अवलोकन करावे. मतदार नोंदणीच्या अनुषंगाने प्राप्त सर्व अर्ज विहीत मुदतीत निकाली काढावे तसेच प्राप्त तक्रारीची गांभीर्याने दखल घेत निराकरण करावे. मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी यासाठी त्यातील त्रुटीची पूर्तता करावी. या बाबी करताना राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन कार्यवाही करा, असे निर्देश त्यांनी दिले.
