Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

मने घडविणारी तंत्रे अस्तित्वात नसल्याने आपण पारतंत्र्यात गेलो

पुणे : स्वराज्याचा विस्तार करीत आक्रमकांना विरोध करताना देखील छत्रपती शिवाजी महाराज विविध विषयावर चर्चा करीत ज्ञानवृद्धी, साहित्य वृद्धी करीत होते. त्यांनी स्वराज्य साहित्यिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील उंचीवर नेऊन ठेवले. कोमजलेली मने घडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरच्या काळात तसा प्रयत्न कोणी केला नाही आणि मने घडविणारी तंत्रे अस्तित्वात नसल्याने आपण पारतंत्र्यात गेलो, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित शिवमहोत्सवाचे उदघाटन कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे झाले. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, सचिन आखाडे, तुषार रायकर, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार आदी उपस्थित होते.

प्रा. नितीन बानगुडे पाटील म्हणाले, इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाहीत. कोणत्याही युद्धात पराभव थेट रणामध्ये होत नाही, तर पहिल्यांदा मनात होतो. रण जिंकायचे असेल तर मन जिंकणे आवश्यक आहे. अन्यायाविरोधात मन घडवण्याकरिता राजमाता जिजाऊंनी शिवरायांना प्रवृत्त केले. स्वराज्याची लढाई सुरू असताना ते रयतेचे मन घडवण्याकडे लक्ष देत होते. त्यामुळेच हे स्वराज्य यशस्वीरित्या उभे राहू शकले. 

संदीपसिंह गिल म्हणाले, इतिहासात अनेक महापुरुष हे आदर्शवत झाले. त्यांच्या जीवन प्रसंगांवर आपण अनेक सण उत्सव साजरे करतो. मात्र, ते उत्सव साजरे करताना त्या महापुरुषांच्या जीवनात काय घडले व त्यांनी काय कार्य केले, हे समजून घेणे गरजेचे आहे. गुगल सारख्या माध्यमातून त्यांची माहिती मिळतेच, पण अभ्यासाकांकडून प्रत्यक्ष कार्य समजून घ्यायला हवे.

प्रकाश चव्हाण म्हणाले, शनिवार, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी मंदार परळीकर व सहका-यांचा भारतीय कला वैभव प्रस्तुत अमर आग हा कार्यक्रम होईल. गोष्ट शिवछत्रपतींच्या अस्सल चित्रांची याविषयावरील लेखक केतन पुरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन रविवार, दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता मुख्य शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading