Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

कलाकार म्हणजे सुंदरतेच्या वाटेवरचे प्रवासी : भाग्यश्री देसाई

पुणे : कलेच्या माध्यमातून व्यक्त होतो तो कलाकार. कलाकार म्हणजे सुंदरतेच्या वाटेवरचे प्रवासी. प्रेमातून व्यक्त होणारी सद्भावनाच विश्वाला तारून नेणारी असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री, कवयित्री भाग्यश्री देसाई यांनी व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे व्हॅलेंटाईन डेनिमित्त (प्रेम दिवस) प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांना ‌‘प्रेम कवी’ पुरस्कार आज (दि. 16) देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. पत्रकार भवन, नवी पेठ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, काव्य विभागाच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपजीविका करताना कलाकार जीविकेचा विचार करू शकतो. कलाकार भय आणि भूक या पलिकडे गेलेला असतो. कलाकारामध्ये व्यक्त होण्याची उर्मी असते, असे देसाई म्हणाल्या. ‌‘आषाढ’ आणि ‌‘इनोसन्स’ या स्वरचित कविता त्यांनी सादर केल्या.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना दयानंद घोटकर यांनी सुरुवातीस कवितेची बीजे कशी रुजली या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, काव्य लिखाणाला सुरुवात झाली ती ‌‘हिमगौरी आणि सात बुटके’ या बालनाट्यासाठी लिहिलेल्या काव्य पक्तींद्वारे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्यकृतींचे वाचन केले त्यातून लिखाणाची वेगळी दृष्टी मिळाली. शांताबाई शेळके, मंगेश पाडगावकर, अनंत माने, जगदिश खेबुडकर यांचा सहवास लाभला त्यामुळे लिखाण तर फुललेच पण त्यांच्या लिखाणाची विशाल, उदात्त शैली अनुभवायला मिळाली. मनोगताचा समारोप ‌‘प्रेम असावे तर चंद्र सूर्यासारखे’ ही कविता सादर करून केला.
सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी रंगत-संगत प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मान्यवरांचा परिचय शिल्पा देशपांडे यांनी करून दिला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‌‘प्रेम’ या विषयावर कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यात स्वप्नील पोरे, प्रभा सोनवणे, राजलक्ष्मी देशपांडे, अपर्णा आंबेडकर, वर्षा बेंडिगेरी-कुलकर्णी, कविता क्षीरसागर, चंचल काळे, मिलिंद शेंडे, केतकी देशपांडे, तनुजा चव्हाण, शिवप्रिया सुर्वे यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती रहाळकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading