जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार संजय साबळे ह्यांचे “साधना” – कला एक साधना हे चित्रप्रदर्शन
विद्यमान कलाजगतातील एक प्रथितयश समकालीन चित्रकार संजय साबळे ह्यांचे ऍक्रिलिक रंगसंगती वापरून कॅनव्हासवर काढलेल्या नवनिर्मित चित्रांचे “साधना” कला एक साधना हे एकल प्रदर्शन जहांगीर कलादालन ए.सी. हॉल, नं.२, काळा घोडा, महात्मा गांधी मार्ग, मुंबई ४००००१ येथे २३ ते २९ जानेवारी २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. ते सर्वांना तेथे रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात त्यांनी एकूण ५४ चित्रे ठेवली असून त्यातील सर्वात मोठी चित्रे १५ फूट x ४.५ फूट, १२ फूट x ६ फूट आकाराची आहेत. ह्या प्रदर्शनात ठेवलेली चित्रे कलासाधना व त्या तपश्चर्येतून लाभणारी मानसिकता आणि परिवर्तनशीलता ह्यांचा उत्तम संगम दर्शवितात आणि सर्वांना एक आगळीवेगळी अनुभूति देतात. जहांगीर आर्ट गॅलरीत हे त्यांचे ५ वे एकल कला प्रदर्शन आहे.

संजय साबळे हे मूळचे उस्मानाबाद (आताचे धाराशिव) येथील रहिवासी. त्यांचे कलाशिक्षण चित्रकला महाविद्यालय लातूर, अभिनव कलामहाविद्यालय, पुणे व सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्, मुंबई येथे झाले. संजय साबळे हे गेल्या २१ वर्षापासून चित्रकला महाविद्यालय, नाशिक कला निकेतन येथे चित्र कला अध्यापक म्हणून कार्यरत असून गेली दोन दशके त्यांनी आपल्या चित्रांची एकल व सामूहिक अशी ४२ कलाप्रदर्शने भारतातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, धुळे, कोलकाता, अमृतसर, रत्नागिरी वगैरे विविध शहरातील नामवंत कलादालनातून भरविली आहेत. त्यांचे प्रयोगशील तंत्र व रंगलेपनातील आणि तंत्रातील वैविध्य ह्यामुळे त्यांच्या चित्रांना नेहमी रसिकांचा सकारात्मक व उदंड प्रतिसाद लाभला आहे. विविध कार्यशाळा, आर्ट कॅम्प व कलाप्रात्यक्षिके तसेच कलाविषयक अनेक उपक्रम ह्यात त्यांनी सक्रिय भाग घेऊन आपली विविधांगी कलारूपे सर्व रसिकांपुढे सादर केली आणि त्यांना त्यातील वैशिटयांबाबत अवगत केले आहे. त्यांना अनेक मान्यवर संस्थानकडून व कलाप्रवर्तक प्रतिष्ठानांकडून बरेच पुरस्कार व मानमरातब लाभले असून त्यांनी कलाक्षेत्रात एक प्रयोगशील नामवंत कलाकार म्हणून नांवलौकिक कमावला आहे. परदेशात काही सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेऊन दुबई, बांगलादेश, वॉशिंग्टन DC (अमेरिका) येथे असणाऱ्या कलारसिकांपर्यंत आपली रचनात्मक शैलीतील वैशिष्ट्य चित्ररूपात त्यांनी पोहचविली आहेत. अनेक भारतीय व विदेशी कलारसिकांकडे व संग्राहकांकडे त्यांची चित्रे संग्रही आहेत.
प्रस्तुत प्रदर्शनात ठेवलेली त्यांची चित्र एका विशिष्ट संकल्पनेवर व विचारांवर आधारित आहेत. कलासाधना करीत असताना कलाकार आपले तन, मन, बुद्धी व वैचारिक संकल्पना ह्यांच्या आधारावर एक प्रकारे तपश्चर्या करून आपल्या चित्रांची निर्मिती करतो. त्यामध्ये साधकाची भूमिका घेऊन पूर्णपणे एकाग्र व त्या विषयाशी तादात्म्य व समरसता पावून जेव्हा तो आपल्या निर्मितीत मग्न असतो तेव्हा त्यांचे मन पूर्णपणे मुक्त व निर्विकार असते आणि त्यावेळी निर्मितीत घडत जाणारे त्याच्या शैलीतील बदल व वैचारिक परिवर्तन यथावकाश त्याच्या चित्रात सामावले जातात. ही नैसर्गिक प्रक्रिया त्याला नवीन चित्रनिर्मितीसाठी प्रेरणा देते आणि त्याला आपले ध्येय/उद्दिष्ट गाठण्यास मदत करते. ही मानसिकता आणि त्यातून साकारलेली चित्ररुपे अर्थातच चित्रकारास अपेक्षित असणारे चित्रपरिणाम व अनुभूति प्रकर्षाने दर्शवितात. नेमकेपणा, बोलकेपणा, दृश्यमानता व दैवी संकल्पना तसेच योग्य रंगसंगती, तिचे अचूक लेपन आणि त्यातून साकारणारे अपेक्षित दृष्यपरिणाम ह्या सर्वांचा योग्य समन्वय साधून साकारलेली ५४ चित्रे संजय साबळे ह्यांनी ह्या प्रदर्शनात ठेवली आहेत. ती चित्रे दर्शकाला एका वेगळ्या जगात नेऊन त्याच्याशी सुसंवाद साधतात आणि त्याला अप्रतिम दृश्यानंदाबरोबर एक दैवी अनुभूति देतात. तसेच त्याला आत्मसमाधान तसेच मनःशांती देतात. त्यामुळे अमूर्त शैलीत काढलेली ही चित्रे सर्वांना भावतात आणि त्यांची उत्तम दाद मिळवितात.
