राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या सहगायनाने १७ व्या वसंतोत्सवाचा समारोप
वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे, नेहा देशपांडे, दीप्ती माटे, पु ना गाडगीळ यांच्या अजित गाडगीळ, तेजस उपाध्ये व राजस उपाध्ये आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तुज मागतो मी आता… या रचनेने राहुल आणि महेश यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘मोगरा फुलला…’ हे गीत सादर केले. हे सूरांनो चंद्र व्हा… या गीताला उपस्थितांनी दिलखुलास दाद दिली… त्यांनी सादर केलेल्या ‘घेई छंद मकरंद…’ या कट्यार मधील नाट्यगीताने उपस्थितांची मने जिंकली.
आम्ही कायम गायकांच्या मैत्रीचे किस्से ऐकत आलो. गायकांच्या मैत्रीत गाण्याची देवाणघेवाण व्हायची हेही ऐकले. वसंतराव देशपांडे आणि पंडित कुमार गंधर्व यांच्यामध्ये अशीच मैत्री होती. हा त्यांचा मोठेपणा होता. माझी अनेक दिवसांची इच्छा होती की मी संगीतबद्ध केलेली एखादी रचना राहुलने गावी. आज ही इच्छा वसंतोत्सव मध्ये पूर्ण होत आहे, याचा आनंद होत आहे असे सांगत महेश काळे आणि राहुल देशपांडे यांनी ‘राम नाम रस भीनी, चदरिया झिनी रे झीनी…’ हे कबीर भजन सादर केले. याचे संगीत महेश काळे यांनी स्वतः दिले आहे हे विशेष.
या नंतर त्यांनी ‘ सुरत पियां की… ही रचना प्रस्तुत केली. ‘कानडा राजा पंढरीचा… या भजनाने त्यांनी समारोप केला.
राहुल आणि महेश या दोघांना निखिल फाटक (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), संजॉय दास (गिटार), विशाल धुमाळ (की बोर्ड), अपूर्व गोखले (व्हायोलिन), रोहन वनगे ( ऑक्टोपॅड), प्रसाद जोशी (पखावज) यांनी साथसंगत केली.
