डॉ. कुमार विश्वास यांची शिवसृष्टीला भेट
पुणे : सुप्रसिद्ध कवी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते कुमार विश्वास यांनी नुकतीच पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ला भेट दिली. शिवसृष्टीचे विश्वस्त विनीत कुबेर, अमृत पुरंदरे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप जाधव, शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल पवार आदी यावेळी उपस्थित होते. शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ आणि शाल देत कुमार विश्वास यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
२१ एकर जागेवर शिवसृष्टी कशी होणार आहे याची चित्रफित पाहून कुमार विश्वास भारावून गेले. पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पुढच्या पिढीला आपला जाज्वल्य इतिहास सांगण्यासाठी घेतलेले प्रयत्न आणि जाणता राजा या महानाट्याचा उल्लेख करीत त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृती जागवल्या.
श्रीमंत योगी हा दृकश्राव्य कार्यक्रम पाहताना, शिवछ्त्रपतींच्या वेळी असलेल्या शस्त्रांचे दालन आणि राज्याभिषेक दालन पाहत त्यांनी समाधान व्यक्त केले. सिंहगड आणि अन्य किल्ले पाहताना लवकरच येथे येत शिवगाथा कथन करण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली.
—-
