Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

एकल तबला वादन आणि कथक नृत्याच्या सादरीकरणाने रंगाला वसंतोत्सवचा दुसरा दिवस

पुणे  : यशवंत वैष्णव यांनी सादर केलेले दिल्ली आणि पंजाब घराण्याचे एकल तबलावादन आणि सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना प्राची शाह यांचे कथक नृत्य यामुळे आजचा वसंतोत्सवचा दुसरा दिवस रंगाला. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आणि पुनीत बालन समूह यांच्या विशेष सहकार्याने यावर्षीच्या १७ व्या वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्मस् या ठिकाणी महोत्सव सुरु असून आश्वासक तबलावादक यशवंत वैष्णव यांच्या एकल तबलावादनाने महोत्सवाला सुरुवात झाली.

वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे, नेहा देशपांडे दीप्ती माटे, व्यंकटेश बिल्डकॉनचे अंकुश असबे,  पु ना गाडगीळ यांच्या अजित गाडगीळ, तेजस उपाध्ये व राजस उपाध्ये आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुण्यामध्ये खूप दिवसांच्या अंतराने एकल तबलावादन सादर करीत असून यासाठी राहुल देशपांडे यांचे आभार यावेळी यशवंती वैष्णव यांनी मानले. ताल तीन ताल सादर करीत त्यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी दिल्ली घराण्याचा कायदा प्रस्तुत केला. आपले गुरू पंडित योगेश शमसी यांच्या दोन रचना,  उस्ताद फिरोज खान यांची बंदिश आणि पंजाब घराण्याची मिश्र रचना आणि अंताक्षरी गत त्यांनी प्रस्तुत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी यशवंत वैष्णव यांना समर्पक संवादिनीसाथ केली.

यानंतर जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना प्राची शाह यांनी कथक नृत्य प्रस्तुत केले. गणेश वंदना प्रस्तुत करीत त्यांनी सादरीकरणाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी ताल झपताल, गुरू गणेश हिरालालजी यांचे तरंग, त्रिवेणी तिहाई, जुगलबंदी आदींचे सादरीकरण केले. २७ चक्कर मध्ये तीन ताल सादर करत त्यांनी उपस्थितांची वाह वाह मिळविली. केसरीया बालन पाधारो म्हारे देश… या ठुमरीने त्यांनी समारोप केला.

यशवंत वैष्णव (तबला), मृणाल उपाध्याय (पखावज), शगुनी चौधरी (गायन), फारुख लतिफ खान (सारंगी), सिबते हसन खान (सतार), नीलय साळवी (संवादिनी) यांनी यावेळी शाह यांना साथसंगत केली. स्नेहल दामले आणि राजेश दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading