आंबेडकरवाद्यांनी इतरांना आपल्यात सामावून घेतले पाहिजे – डॉ. सुनीलकुमार लवटे
पुणे – आपली चळवळ विभाजनाच्या पायरीवर उभी आहे, त्यामुळे आंबेडकरी चळवळ जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्यातली एकी वाढवणं गरजेच आहे. त्यासाठी चळवळीतल्या लोकांनी इतर जातीच्या, समाजाच्या लोकांनाही आपल्यात सामावून घेतले पाहिजे, असे वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने रघुनाथराव राक्षे स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची समीश्रा’ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ.) विजय खरे उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
काउंटी लोकसंख्येत दलितांची टक्केवारी ५१ टक्के आहे. तरीही सत्तेत, सरकारमध्ये दलितांचा सहभाग, स्थान नगण्य आहे. त्यामुळे आपण या सर्वांमध्ये कुठे आहोत, आपले अस्तित्व काय आहे, या सर्वांचा खोलवर विचार आपल्याला करावा लागणार आहे, असेही डॉ. लवटे यावेळी म्हणाले. तर आजची परिस्थिती बघता चळवळीमध्ये समन्वयाची खुप गरज आहे. भविष्यात सामाजिक, राजकीय,आर्थिक, सांस्कृतिक प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले यांचे विचार सोबत घ्यावे लागणार आहेत, असे प्रा.(डॉ.) विजय खरे म्हणाले.
विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर समागृहात झालेल्या या कार्यक्रमात माजी केंद्रीय कायदा मंत्री मा. रमाकांतजी खलप, गोवा यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्काराने तर समाजसेवक डॉ. सुरेश गोरेगावकर यांना तालूका स्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ. सुरेश गोरेगावकर लिखित ‘राजर्षी शाहू समजून घेताना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रस्तावना मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी तर सूत्रसंचालन श्री. दिपक मस्के यांनी केले. यावेळी फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
